मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. वाढलेल्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याबरोबरच मुंबईतील गल्ली-बोळामध्ये रुग्णवाहिका लवकर पोहोचणे कठीण असते, अशा रुग्णांच्या सेवेत पेशाने शिक्षक असलेले दत्तात्रय सावंत धावून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी विनामूल्य रुग्णालय ते घरपोच अशी रिक्षा सेवा देत आहेत, त्यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी..
रिक्षाचालक दत्तात्रय सावंत हे घाटकोपरमध्ये राहतात. ज्ञानसागर विद्या मंदिर शाळेत ते इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत दत्तात्रय सावंत हे मागील काही दिवसांपासून ईशान्य मुंबईत कोरोना रुग्ण असलेल्या व्यक्तींना व त्यांच्या नातेवाईकांना विनामूल्य घर ते रुग्णालय व रुग्णालय ते घर अशी सेवा देत आहेत. सावंत यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सावंत यांनी आतापर्यंत 26 कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत प्रवास दिला आहे.