मुंबई : भाईंदरयेथून प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी शनिवारी सकाळी सहा साडेसहाच्या सुमारास दादर रेल्वे स्थानकावर उतरलेल्या महिलेची पर्स पोलिसांनी मिळून दिली. प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराकडे जाण्यासाठी महिलेने टॅक्सी केली होती. गडबडीत सोन्याचे दागिने असलेली पर्स महिला टॅक्सीत विसरली. त्यानंतर महिलेने दादर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. दादर पोलिसांनी तत्परतेने टॅक्सी नंबर मिळवून टॅक्सी चालकाचा शोध घेतला. साडेपाच लाखांचा ऐवज असलेली पर्स शिक्षिका महिलेला दादर पोलिसांनी परत मिळवून दिली.
पर्समध्ये लाखोंचा मुद्देमाल :दादर पोलिसांनी टॅक्सीमध्ये विसलेल्या पर्समधील सोने, डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल तात्काळ शोध घेऊन परत मिळवून दिल्यानंतर दादर पोलिसांच्या तत्परतेबद्दल कौतूक केले जात आहे. निखिला विठ्ठल कारवा ( 43 वर्ष) या भाईंदर पश्चिम येथे राहतात. निखिला या शनिवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दादर रेल्वे स्टेशन येथून सिद्धिविनायक मंदिर येथे दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांची पर्स त्या टॅक्सीमध्ये विसरल्या. या पर्समध्ये दोन डायमंडच्या बांगड्या किंमत 2 लाख रुपये, चार सोन्याच्या बांगड्या किंमत 2 लाख रुपये, एक सोन्याची अंगठी, किंमत 50 हजार आणि 1 लाख रुपये, असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल होता.