मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचार बंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (टीएमएच) देशाच्या विविध भागातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कॅन्सर रुग्ण व नातेवाईकांच्या वास्तव्याच्या सेवेसाठीचे निवारे आधीच पूर्ण भरलेले आहेत. त्यामुळे अशा परिस्थिती काही रुग्ण तसचे नातेवाईकांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.
टाटा मेमोरियल रुग्णालयातील निवारे भरले गच्च हेही वाचा-लॉकडाऊनमुळे दुकाने बंद; दारूसाठी तळीरामांनी फोडले बार
केमोथेरपीमुळे कॅन्सर रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होते. अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग होणे सहज शक्य आहे. कर्करोग असणाऱ्यांना कोरोना व्हायरसचा धोका सर्वात अधिक असतो. अशा पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने उपाय योजना करण्याची तातडीने गरज आहे. रस्त्यावर राहायला भाग पडलेले हे रुग्ण सर्वात जास्त उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातील आहेत.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज आठवा दिवस आहे.