मुंबई : मुंबई हे अतिशय वेगवान आणि धावपळीचे शहर आहे. इथे प्रत्येकजण घड्याळाच्या काट्यावर आपली कामे करत असतो. इथे अनेकजण गावातून आपली स्वप्न घेऊन येतात. मुंबईत आल्यावर प्रत्येकाला सामना करावा लागतो तो म्हणजे इथल्या लोकल ट्रेनच्या गर्दीचा. मुंबईतील लोकल ट्रेन ही मुंबईची मुख्य वाहिनी मानली जाते. मात्र, याच रेल्वेतील गर्दीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, अनेकांना आयुष्यभरासाठी अपंगत्व आले आहे. ज्यांना अपंगत्व आले आहे त्यातले काही जण सावरले पण अनेक जण आजही जगण्याचा संघर्ष करत आहेत.
तरण सिंगचा संघर्ष : तरण सिंग या तरूणाचा रेल्वेतून पडून अपघात झाला आणि त्याला अपंगत्व आले. नेहमी असे म्हटले जाते की, ज्याला जन्मतः अपंगत्व असते त्याच्यात एक काही ना काही विशेष कला असते. त्या कलेच्या जोरावर ती अपंग व्यक्ती आपला जीवनाचा सामना करत असतो. मात्र, ज्यांना एखाद्याला अपघातामुळे अपंग येत त्यांचे काय? अशा लोकांच्या आयुष्यात संघर्ष हा मोठा असतो. अनेकांचा हा जगण्यासाठीचा संघर्ष अद्याप देखील सुरू आहे. दरम्यान, रेल्वे अपघातामुळे तरण सिंगच्या आयुष्यात अनेक आव्हाने निर्माण झाली. मात्र, इतरांप्रमाणे निराश न होता या अपंगत्वावर मात करत तरणने मुंबईत सोया चापचा व्यवसाय सुरू केला आहे.
तरण सिंग रेल्वे अपघातमुळे अपंग : तरण सिंग या तरूणाने ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले की, ही 2015 सालची घटना आहे. मी काही कामानिमित्त रेल्वेने चाललो होतो. लोकल ट्रेनला खूप गर्दी होती. अशात माझा अपघात झाला आणि मला अपंगत्व आले. मी 90% अपंग आहे. त्यामुळे माझे पुढील आयुष्यच हे दुसऱ्यांच्या सहकार्यावर आणि मदतीवर अवलंबून आहे. थोडे फार मला ज्या काही हालचाली करायच्या असतात त्या मी माझ्या व्हीलचेअरवर बसून करतो. मात्र, मला कोणतही काम करताना खूप त्रास होतो. माझे शरीर मला साथ देत नाही. मात्र, आता निराश न होता जे काही आपल्या सोबत घडलेले आहे ते स्वीकारून परिस्थितीशी संघर्ष करत आयुष्य जगणे हा मी निर्णय घेतला आहे.