मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. कोरोनाचे रुग्ण आढळणारे विभाग, इमारती सील केल्या जात आहेत. मलबार हिल येथील तन्ही हाईट्स या इमारतीत गेल्या 7 दिवसांत 21 रुग्ण आढळले आहेत. यामुळे मुंबई महापालिकेने सुरक्षेच्या कारणावरून ही इमारत सील केली आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.
मुंबईमधील उच्चभ्रूंची वस्ती समजल्या जाणाऱ्या मलबार हिल, नेपियंसी रोडवर तन्ही हाईट्स ही इमारत आहे. या इमारतीमध्ये गेल्या 7 दिवसांत कोरोनाचे 21 रुग्ण आढळले आहेत. 21 पैकी 19 रुग्ण हे या इमारतीत काम करणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, वाहनचालक आहेत. या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे इमारतीमधील इतर रहिवाशांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने 20 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
पालिकेकडून इमारत सॅनिटाइझ केली जात आहे. इमारतीमधील सर्व रहिवाशांची स्क्रीनिंग करण्याची सूचना पालिकेकडून करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या डी विभागाकडून देण्यात आली.
मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 66 हजार 507 वर पोहोचला आहे. त्यापैकी 3 हजार 669 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईमधून आतापर्यंत 33 हजार 491 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 29 हजार 347 सक्रीय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. 14 ते 20 जूनपर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.96 टक्के इतका आहे. मुंबईमधील कोरोना रुग्ण दुपटीचा दर 36 दिवसांवर पोहचला आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या चाळी आणि झोपडपट्ट्या असलेले 834 विभाग प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तर 5 हजार 205 इमारतींमध्ये काही मजले तर काही विंग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -सरकारने 'आरे'वरील स्थगिती उठवावी, किरीट सोमय्या यांची मागणी