मुंबई :राज्यात H3N2 या व्हायरसने हाहाकार माजला असून नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. विशेष करून या व्हायरसमुळे अहमदनगर मध्ये चद्रकांत सकपाल या २३ वर्षाच्या मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे, की राज्यामध्ये H1N1 आणि H3N2 याचे ९ मार्च पर्यंत २६९ रुग्ण होते. १२ मार्चला हा आकडा ३५२ वर गेला. म्हणजे नक्कीच यामध्ये वाढ झालेली आहे.
चंद्रकांत सकपाल याचा मृत्यू :H3N2 या आजाराने २३ वर्षीय चंद्रकांत सकपाल याचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात असले तरी अजूनही याबाबत अंतिम अहवाल येणे बाकी आहे. चंद्रकांत सपकाल याच्या मृत्यू विषयी सांगताना तानाजी सावंत म्हणाले की, अहमदनगर, वडगाव येथील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील या मेडिकल कॉलेजचा चंद्रकांत हा विद्यार्थी होता. परीक्षा संपल्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत अलीबाग येथे फिरायला गेला होता. त्यानंतर पुन्हा कॅम्पस मध्ये आल्यानंतर त्याला ताप व अंगदुखी जाणवू लागली. दुसऱ्या दिवशी त्यांच्या आई-वडिलांनी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु १२ मार्चला त्यांच्या कुटुंबाने त्याला नगरच्या साईदीप या खाजगी रुग्णालयात हलवले. तेथे त्याचा १३ मार्च रोजी रात्री बारा वाजता दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु चंद्रकांत सकपाल याला यापूर्वीसुद्धा कोविड, H3N2 अशा अनेक व्याधी असल्याकारणाने त्याच्या मृत्यूचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमक कारण स्पष्ट होईल.