मुंबई -महसूल विभागातील तलाठ्यांची भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेत तांत्रिक कारणामुळे अडथळा आला. यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारचं असं बेजबाबदार वर्तन खपवून घेतलं जाणार नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, परीक्षेतील विद्यार्थ्यांनी निराश होऊन टोकाचं पाऊल उचलल्यास राज्य सरकार जबाबदार असणार आहे.
पुन्हा परीक्षा शुल्क आकारू नये -पुढे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्रे सुरू करण्याची आवश्यकता होती. त्याऐवजी, सरकारने फक्त चार केंद्रे सुरू केली आहेत. त्यामुळे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना दूरवरच्या अंतरावर जाण्यास भाग पाडलं. परीक्षेला बसण्यासाठी लांबचा प्रवास करण्यास भाग पाडले. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी खूप मेहनत घेतली. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, राज्य सरकारनं परीक्षा शुल्क म्हणून प्रति उमेदवार एक हजार रुपये आकारले आहेत. आता, या उमेदवारांचे काय होणार? सरकारने तलाठी भरती परीक्षा दुसऱ्या दिवशी घेण्याचे ठरविले तर पुन्हा परीक्षा शुल्क आकारू नये, असे वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला आवाहन केले.