मुंबई- राज्यात लवकरच येत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान ‘ईव्हीएम्’ यंत्राऐवजी ‘बॅलेट पेपर’ द्वारे घेण्यात यावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत केली. विधानमंडळाच्या नियम २३ अंतर्गत त्यांनी याविषयी अशासकीय ठराव मांडून त्यासाठीची मागणी सरकारकडे केली. त्यावर सभापतींनी हा ठराव स्वीकारत असल्याचे सांगत याविषयीची शिफारस ही सरकारकडे केली जाईल असे स्पष्ट आश्वासन सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी विधानपरिषदेत दिले.
विधानसभेचे मतदान ‘ईव्हीएम्’ ऐवजी ‘बॅलेट पेपर’द्वारे घ्या; धनंजय मुंडेंची मागणी - विधानपरिषद
राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या मतमोजणीत प्रचंड तफावती आढळून आल्या आहेत. यात ३७६ मतदानसंघामध्ये प्रत्यक्ष मतदान आणि मतदानाची आकडेवारी यांमध्ये तफावत स्पष्ट झाली असल्याचे मुंडे यावेळी म्हणाले.
आपला अशासकीय प्रस्ताव सभागृहात मांडताना मुंडे यांनी सांगितले की, राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या मतमोजणीत प्रचंड तफावती आढळून आल्या आहेत. यात ३७६ मतदानसंघामध्ये प्रत्यक्ष मतदान आणि मतदानाची आकडेवारी यांमध्ये तफावत स्पष्ट झाली आहे. त्यामुळे ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून देशात आणि राज्यात घेण्यात येत असलेल्या निवडणुकांमुळे जनतेत एक संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे येत्या विधानसभेची निवडणूक ही ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी मुंडे यांनी केली.
यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा विषय संवेदनशील आहे. मात्र, अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे यावर चर्चा करण्यास पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे हा प्रस्ताव अखेरच्या दिवशी मांडणे उचित होणार नाही. त्यामुळे यावर पुढील अधिवेशनामध्ये यावर चार्च करणे उचित होईल, मात्र याविषयीची भावना लक्षात घेऊन सरकारला तशी शिफारस केली जाईल, असे आश्वासन सभापतींनी दिले.