मुंबई - मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून लॉकडाऊन होता. तेव्हापासून मुंबई महापालिकेच्या महासभा झाल्या नव्हत्या. कोरोनामुळे या सभा सध्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जात आहेत. पालिकेच्या अर्थसंकल्प मंजुरीसाठी नगरसेवकांना आपले मत मांडता यावे म्हणून या सभा प्रत्यक्ष घ्याव्यात, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौरांकडे केली.
हेही वाचा -महाराष्ट्र : आज 2216 नवीन कोरोना रुग्णांची भर; 15 रुग्णांचा मृत्यू
ऑनलाईन सभा
मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसाठी खर्च करण्याचे सर्वाधिकार पालिका आयुक्तांना देण्यात आले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर स्थायी समितीच्या बैठका आणि महासभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यास सुरुवात झाली. स्थायी समितीच्या बैठका प्रत्यक्ष घ्याव्यात म्हणून भाजपने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर स्थायी समिती सभा प्रत्यक्षात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ऑक्टोबरनंतर स्थायी समितीच्या सभा प्रत्यक्षात सुरू झाल्या. मात्र, पालिका सभागृहात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाऊ शकत नसल्याने आजही महासभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केल्या जात आहेत.
प्रत्यक्ष सभा
कोरोना महामारीमुळे गेले ११ महिने महानगरपालिका सभा प्रत्यक्ष पार पडलेल्या नाहीत. त्यामुळे, नगरसेवकांना प्रभागात नागरिकांच्या समस्या, तसेच कोविड संकटाचा सामना करताना नागरी कामांबाबत विविध प्रश्नांना वाचा फोडताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे, सर्व नगरसेवकांना महापालिकेसंबंधी निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे. मार्च महिन्याच्या महापालिका सभांमध्ये अर्थसंकल्पावर चर्चा होते. या सभा अत्यंत महत्वाच्या असतात. त्यामुळे, या सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न घेता प्रत्यक्ष सभागृहात घेणे आवश्यक आहे. तरी याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. जर महापालिका सभागृहात सभा प्रत्यक्ष घेणे शक्य नसेल, तर कुठल्याही परिस्थितीत अर्थसंकल्पासारख्या महत्वाच्या विषयावरील सभा आभासी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) पद्धतीने घेऊ नयेत, अशी मागणी लेखी पत्राद्वारे भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौरांकडे केली.
मोठ्या सभागृहात सभा घ्या
शिंदे यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्प २०२१-२०२२ वरील सर्व सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न घेता प्रत्यक्ष घ्याव्यात. त्यासाठी आवश्यक असल्यास मोठे सभागृह आरक्षित करून कोविडच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करत प्रत्यक्ष सभा घ्याव्यात, असे लेखी पत्र महापौरांना दिले.
हेही वाचा -भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत