महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने अधिक दक्षता घ्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Corona review meeting CM Thackeray

ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणुमुळे राज्यात अधिक दक्षता अवलंबली जात असली तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता, अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिलेत.

Chief Minister Uddhav Thackeray's notice
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Jan 4, 2021, 8:34 PM IST

मुंबई - ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणुमुळे राज्यात अधिक दक्षता अवलंबली जात असली तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता, अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिलेत.

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे व टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. कोरोना लसीकरणाचा ड्राय रन नुकताच झाला. आता केंद्र शासनाकडून लस मिळाल्यानंतर प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात होईल. त्याबाबतच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

त्या-त्या विमानतळांवरून क्वारंटाईन करावे - मुख्यमंत्री

ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे की, इतर राज्यातील विमानतळांवर उतरून प्रवाशी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यांचा मागोवा काढणे शक्य होत नाही. केंद्र सरकारने अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या-त्या विमानतळांवरून क्वारंटाईन करावे. लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, लसीकरणानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाल्यास त्यावरील उपचाराची पूर्वतयारी ठेवा. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शनासाठी टास्क फोर्ससारखी यंत्रणा तयार करावी. आरोग्य संस्थांमध्येच लसीकरण करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

हेही वाचा -राज्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव, ८ जणांना लागण

यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी लसीकरणाच्या तयारीचे सादरीकरण केले. बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.

हेही वाचा -दिलासा..! आता 'बीडीडी'तील 2017 नंतरचे रहिवासीही होणार पात्र

ABOUT THE AUTHOR

...view details