मुंबई:राज्यातील सत्तेच्या पेचाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने या संदर्भात सरन्यायाधीशांनी जी निरीक्षणे नोंदवली आहेत. त्याने भयभीत झालेल्या काही पक्षाच्या लोकांनी आता सरन्यायाधीशांनाच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. ट्रोल करण्याची भाडोत्री व्यवस्था कुठल्या पक्षाकडे आहे हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणूनच सरन्यायाधीशांना ट्रोल करणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी, यासाठी काँग्रेसचे खासदार यांनी राष्ट्रपतींकडे मागणी केल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. राज्यातील सरकार पाडण्यासाठी सुरतपासून गुहाटीपर्यंत काय काय घडले ते सर्व राज्याला चांगले माहीत आहे. राज्यपालांनी सुद्धा आपल्या पदाचा आणि अधिकारांचा दुरुपयोग करून सत्तापक्षाला कसे अडचणीत आणले, हे सुद्धा जनतेला माहीत आहे. याच संदर्भात सरन्यायाधीशांनी काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. सरन्यायाधीशांच्या या टिप्पणीवर त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, अशा लोकांवर कारवाई सुरूच झाली पाहिजे.
सरकार कधीही पडू शकते:सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात काय निकाल लागेल, यावर आत्ताच बोलणे योग्य नाही. मात्र, निकाल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणार हे स्पष्ट झाल्याने मंत्रालयामध्ये भीतीचे आणि लगबगीचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांना काहीतरी चाहूल लागली असे दिसत असून सरकारचा आता फार काळ शिल्लक नाही. हे सरकार कधीही पडू शकते, असे स्पष्ट होत असल्याचे पटोले म्हणाले.