मुंबई : आपल्या देशाची ओळख ही कला जोपासणारा आणि आपली संस्कृती जोपासणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. अशा या आपल्या देशात अनेक कलाकार आहेत. ज्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात येते. मग, ते गायन करणाऱ्या कलाकारातील किंवा वादन करणारे कलाकार असतील. मात्र, हे कलाकार ज्या वाद्य वादनात आपले विशेष प्राविण्य मिळवतात ते वाद्य बनवणारे कारागीर मात्र आजपर्यंत दुर्लक्षितच राहिलेत. आता पहिल्यांदाच एका तबला बनवणाऱ्या कलाकाराला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित:किशोर हरिदास व्हटकर यांना केंद्र सरकारच्या अखिल भारतीय संगीत कलाकादमीने उस्ताद बिस्मिल्ला खान युवा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. अकादमीने सन्मानित केलेले किशोर व्हटकर देशातील पहिले युवा तबला निर्माते आहेत. चार पिढ्यांपासून तबले घडविणाऱ्या व्हटकर बंधूंचा तबला निर्मिती व्यवसायात नाव लौकिक आहे. मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरात गेल्या 22 वर्षांपासून सुरू असलेल्या तबला निर्मितीचा व्यवसाय आहे. भारतासह हा देशाबाहेरील प्रसिद्ध तबला वादकांकडील तबला हा येथून बनवून घेतले जातात. प्रतिकूल परिस्थितीतून तबले तयार करण्याची कला अवगत केलेल्या किशोर यांच्या सन्मानामुळे तबला निर्मितीचे क्षेत्रात पुन्हा एक नवीन झळाळी प्राप्त झाली आहे.
पहिल्यांच मिळाला पुरस्कार: किशोर व्हटकर सांगतात की, पहिल्यांदाच तबला बनवणाऱ्या कारागिराला या क्षेत्रात पुरस्कार मिळाला आहे. त्याचा फार आनंद होत आहे. या क्षेत्रामध्ये आता आमची चौथी पिढी कार्यरत आहे. पणजोबा, आजोबा, वडील आणि आता किशोर व्हटकर आणि त्यांचे बंधू मनोज व्हटकर ही चौथी पिढी या क्षेत्रात आहे. किशोर हे 2003 पासून या क्षेत्रात काम करत आहेत.