राजकारणी म्हणजे माझा सकाळचा नाश्ता- टी. एन. शेषन - भारतातील निकोप निवडणूकांचे जनक
९० च्या दशकात राजकीय नेत्यांना घाम फोडणारे निवडणूक आयुक्त म्हणून शेषन यांची ओळख आहे. शेषन यांचा जन्म 15 डिसेंबर 1932 ला केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील तिरुनेलै येथे झाला होता. मद्रास ख्रिश्चन महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. त्याच बरोबर याच महाविद्यालयात त्यांनी लेक्चरर म्हणूनही काही काळ काम केले होते.
मुंबई-भारताचे 10 वे मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे रविवारी निधन झाले. ८६ वर्षांच्या शेषन यांनी चेन्नईमध्ये अखेरचा श्वास घेतला. हृदयक्रिया बंद पडल्यामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे. माजी निवडणूक आयुक्त एस. वाय कुरेशी यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.
९० च्या दशकात राजकीय नेत्यांना घाम फोडणारे निवडणूक आयुक्त म्हणून शेषन यांची ओळख आहे. शेषन यांचा जन्म 15 डिसेंबर 1932 ला केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील तिरुनेलै येथे झाला होता. मद्रास ख्रिश्चन महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. त्याच बरोबर याच महाविद्यालयात त्यांनी लेक्चरर म्हणूनही काही काळ काम केले होते.
टी. एन. शेषन यांनी डिसेंबर 1990 ते डिसेंबर 1996 या कालावधीत देशाचे दहावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिले. ते 1955 च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील तुकडीचे अधिकारी होते. १९९० मध्ये त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्विकारला होता. भारतातील निवडणूकांत निष्पक्षपणा, सुसूत्रता आणण्यात शेषन यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी पदभार स्विकारला तेव्हा स्थिती अतिशय वाईट होती. मात्र, कडक पाऊलं उचलत त्यांनी सुधारणांचा धडाका लावला. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी प्रशासनाला लावलेल्या शिस्तीमुळे ते लोकप्रिय झाले होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी निवडणूक आयोगाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी 1996 मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारत सरकारनेही पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्काराने त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.
टी. एन. शेषन यांनी भारतातील निवडणुक प्रक्रियेत अनेक सुधारणा घडवून आणल्या. हे करताना त्यांना प्रचंड विरोधही झाला. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या निवडणुक प्रक्रीयेतील आमूलाग्र बदलांचा विरोध केला होता. परंतू, कुठल्याही दबावाला बळी पडत त्यांनी माघार घेतली नाही. निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी त्यांच्याच कार्यकाळापासून सुरू झाली. प्रचार, ध्वनिक्षेपकांचा वापर याला शेषन यांनी चाप बसवला. रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत प्रचारावर बंदी, धर्माच्या, देवांच्या, महापुरुषांच्या नावावर मते मागण्यावर त्यांनीच बंदी आणली. शेषन यांनी काही काळ कॅबिनेट सचिव म्हणूनही काम पाहिले होते. निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती होण्याआधी ते योजना आयोगाचे सदस्य होते.