मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात मिठाई, पेढे दिसेनासे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मिठाई खरेदीवर मोठा परिणाम दिसून आला आहे. यामुळे दरवर्षी होणारी मिठाई खरेदी यावर्षी कमी झाली आहे. या सर्व बाबींमुळे मिठाई व्यावसायिक यांचे मोठे नुकसान होत असून खरेदी ही दहा टक्क्यांवर सुरू आहे. गेली अठरा वर्ष मी होलसेल दराने मिठाई तयार करून दुकानांना द्यायचं काम करतो. परंतु, एवढे मोठे नुकसान कधीही झाले नव्हते, असे मिठाई व्यावसायिक दिलीप इनकर यांनी यावेळी सांगितले.
दरवर्षी गणेशोत्सवात मिठाईची विक्री तेजीत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिठाई व्यावसायिकांना मोठ्या नुकसानीला झाले सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवात घराघरात नातेवाईकांची रेलचेल असते. नातेवाईकांचा पाहुणचार आणि बाप्पाला नैवेद्य म्हणून मिठाईचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. यंदा मात्र मिठाईकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे लोक मिठाई विकत घेण्यास घाबरत आहेत. यावेळी साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात असल्यामुळे यंदा घरातच गोड पदार्थ तयार केले जात आहेत.