मुंबई Swachh Bharat Mission : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारनं शहरं तसेच ग्रामीण भागामध्ये 'एक तारीख, एक तास' हा उपक्रम आयोजित केला असून राज्यातही मुंबईसह अनेक ठिकाणी स्वच्छ अभियान या उपक्रम राबविण्यात येतोय. मुंबईतील शिवडी किल्ल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीही स्वच्छता अभियान राबवलं. याप्रसंगी बोलताना त्यांनी स्वच्छता अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांची चळवळ केल्यानं याला मोठा प्रतिसाद भेटत असल्याचं सांगितलंय.
घनकचऱ्याचं व्यवस्थापन : यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, आता मल जलाचे शुद्धीकरण काम मोठ्या प्रमाणात हातात घेतलेलं आहे. महाराष्ट्रात २२१ छोट्या मोठ्या शहरांमध्ये सिवरेज ट्रीटमेंटचं काम चालू आहे. मोठ्या प्रमाणात घनकचऱ्याचं व्यवस्थापन आपण करत आहोत. नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ या दृष्टीनं त्यावर प्रक्रिया करून त्यापासून विद्युत निर्मिती करायची, विविध उपक्रम करायचे अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाला लोक चळवळीमध्ये परावर्तित केलं त्यामुळंच हे सर्व शक्य झाल्याचं फडणवीस म्हणाले. एखादी गोष्ट जेव्हा लोकांची चळवळ होते तेव्हा त्याला कोणीच थांबवू शकत नाही. अशीच लोक चळवळ किल्ल्यांकरता स्वच्छतेची लोकचळवळ आजपासून सुरू होत आहे. यापुढं आपल्या किल्ल्यांवर स्वच्छता दिसेल, कुठेही कचरा दिसणार नाही, असा विश्वास याप्रसंगी फडणवीसांनी व्यक्त केलाय.