मुंबई - पाकिस्तानातून कांदा आयात करण्याच्या निर्णयावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदीजी पाकिस्तानचा कांदा आयात करा आणि देशातील शेतकऱ्याला बरबाद करून, इम्रान खानचे हात मजबूत करा असे म्हणत त्यांनी मोदींना लक्ष्य केले आहे.
पाकिस्तानातून कांदा आयात करुन इम्रान खानचे हात मजबूत करा, राजू शेट्टींचा मोदींना उपरोधिक टोला - राजू शेट्टींचा मोदींवर निशाणा
पाकिस्तानातून कांदा आयात करण्याच्या निर्णयावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
कांद्याच्या भावात होत असलेल्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र शासनाने दोन मोठे निर्णय घेतले आहेत. पहिला निर्णय पाकिस्तान, इजिप्त अफगाणिस्तानमधून 2 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्यासाठी निविदा काढली. तर दुसरा निर्णय हा कांदा निर्यात मूल्यात तब्बल 850 डॉलरची वाढ केली. या अगोदर निर्यात मूल्य हे शून्य होतं. या दोन्ही निर्णयामुळे कांद्याच्या भावात घसरण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या निर्णयाचा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसेल. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याला चांगला भाव मिळत होता. शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे पडत असताना केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयात करण्याचा आणि कांदा निर्यात मूल्यात भरमसाठ वाढ केली. त्यामुळे कांद्याचे भाव आता पुन्हा पडतील असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.