एसटी कामगार बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी श्रीरंग बरगे यांची प्रतिक्रिया मुंबई: एसटी बँक व सभासदांसमोर अनेक अडचणी असताना त्याकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. मुद्दे माहिती नसलेले लोक या बँकेत घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. आगामी बँक निवडणुकीत मुख्य मुद्द्यांना सोयीस्कररित्या बगल दिली जात आहे. ज्यांचा बँकेच्या उभारणीत किंवा जडणघडणीत काहीही संबंध नाही अशा राजकीय नेत्यांचे फोटो लावून त्यांच्या नावे बँक निवडणुकीत मते मागितली जात आहेत. ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया बरगे यांनी दिली आहे.
दोन वर्षांचे ऑडिट 2 दिवसात कसे?कर्मचाऱ्याच्या हितासाठी स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑप. बँकेची स्थापना करण्यात आली आहे. ETV शी बोलताना श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, "सध्या बँकेचे ७० हजार सभासद असून बँकेची ४ हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल आहे. कोरोना महामारीत बँकांचे ऑडिट झाले नव्हते. या कारणामुळे शाखानिहाय ऑडिटरची नेमणूक बँकेने केली. यात आक्षेपाची बाब म्हणजे या ऑडिटरने दोन वर्षांचे ऑडिट साधारण 1 ते 2 दिवसात करून दिले. आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा असा की, या बँकेने ऑडिट करणाऱ्या CA ला शाखा निहाय 80 हजार तपासणी खर्च दिले आहेत. तर एकूण 65 लाख रुपये संबंधित व्यक्तीला देण्यात आले आहेत.
निवडणुकीत भावनिक मुद्द्यांना प्राधान्य:कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असलेल्या व त्यांच्या परिश्रमातून उभारलेल्या या बँकेच्या कारभारात पारदर्शकपणा यावा व ७० हजार सभासद असलेल्या सभासदांचे नुकसान होऊ नये, असे आम्हाला वाटते. बरगे यांनी आरोप केला आहे की, "या निवडणुकीत बँकेतील भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांच्या समस्या हे प्रमुख मुद्दे मागे पडले असून भावनिक मुद्दे निवडणुकीत चर्चेला आणून मूळ विषयांना बगल दिली जात आहे. ज्यांच्या बँक आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न माहिती नाहीत असे लोक हे भावनिक विषय निवडणुकीत आणत आहेत. त्याच प्रमाणे संप कालावधीतील साडेपाच महिन्यांचा पगार भरून देऊ, असे सांगून कामगारांची फसवणूक केली. असे लोक पुन्हा बँक निवडणुकीत स्वतःचे पॅनल उभे करून नेतृत्व करीत आहेत. त्या पासून कर्मचाऱ्यांनी सावध झाले पाहिजे, असे बरगे म्हणाले.
बॅंकेला वाचविण्यासाठी सुचविला उपाय:बँकेची एकूण उलाढाल ४ हजार कोटी रुपयांची आहे. बँकेची स्थिती चांगली आहे. पण काही संधीसाधूंनी आर्थिक उधळपट्टी केली आहे. त्यामुळे गरज नसलेल्या शाखा व विस्तार केंद्रे बंद केली पाहिजेत. सभासदांनी कर्ज घेतल्यावर त्यावर जे व्याज लावले जाते ते कमी करणे आवश्यक आहे. पण हे करण्यातसुद्धा अडचणी आहेत. कारण बँक फक्त ३ टक्क्यांवर चालत आहे. कर्जावरील व्याज कमी केल्यास बँक चालवणे कठीण होईल. त्यामुळे हे व्याज देखील बंद केल्यास शाखा सुरू ठेवणे कठीण होईल. म्हणून काही अनावश्यक शाखा व विस्तार केंद्र कमी करून आस्थापनांवरील खर्च कमी करून सभासदांच्या कर्जावरील व्याजदर कमी करायला हवा. या कडेही बरगे यांनी लक्ष वेधले आहे.