मुंबई - इंपेरिकल डाटावरून विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये भाजप आमदार गेले असता, यावेळी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव आणि भाजप आमदार संजय कुठे यांच्यात धक्काबुक्की झाली होती. यासंदर्भात 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले असून या बाबातचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. निलंबित आमदारांमध्ये पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांचा समावेश आहे.
तालिका अध्यक्षांनी सांगितला घटनाक्रम -
दरम्यान, यासंदर्भात बोलताना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाच्या आमदारांवर गंभीर आरोप केले. 'विधानसभा 10 मिनिटांसाठी स्थगित केल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी केबिनमध्ये येऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच यावेळी उपस्थित विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना तालिका अध्यक्षांनी या सदस्यांना थांबवा, अशी मागणी केली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही रागात असून त्यांना थांबवणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली असल्याचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले. हा सगळा प्रकार घडत असताना एकही चुकीचा शब्द चुकीचा बोललो नाही. मी काही चुकीचे बोललो असेल तर ते विरोधकांनी सिद्ध करावे, ते सिद्ध झाल्यास सदस्यांना होणारी शिक्षा मीसुद्धा भोगायला तयार आहे, असे स्पष्टीकरण तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले.