महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाराज होऊन पक्षातून गेले त्यांना स्वगृही परत आणू - सुशीलकुमार शिंदे

नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे

By

Published : Jul 18, 2019, 10:01 PM IST

मुंबई -राज्यात काँग्रेसचे कार्यकर्ता जोडण्याचे काम करायचे आहे. तसेच जे नाराज होऊन पक्षातून बाहेर गेले त्यांना पुन्हा परत बोलावून घेऊया, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

गेल्या १९८० सालामध्ये इंदिरा गांधी यांनी बोटावर मोजण्याइतक्या कार्यकर्त्यांवर ४०० दरम्यान उमेदवार निवडून आणले. त्याचप्रमाणे आपण देखील करू, असे आवाहन देखील शिंदे यांनी यावेळी केले. तसेच नवनिर्वाचीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले.

प्रदेशाध्यक्ष पद डोक्यावरील काटेरी मुकुट - अशोक चव्हाण

मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा हा नैतिक जबाबदारी स्वीकारून दिला होता. मात्र, हा माझा निरोप समारंभ नाही. मी काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष पद हे एक डोक्यावरील काटेरी मुकुट असल्याची भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

पक्षासाठी कधीही एकट्याने प्रयत्न करून चालत नाही. त्यात टीम वर्क असल्यास त्याचे सकारात्मक परिणाम येतात. थोरात हे मृदू स्वभावाचे असल्याने त्यांचा लाभ पक्षाला होईल. ग्रामपंचायत पर्यंतचा कार्यकर्ता हा राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येईल या उमेदीने अपेक्षा ठेऊन आहे. त्यामुळे मी राजीनामा दिल्यानंतर आम्ही प्रक्रिया सुरू ठेवली आणि राज्य कमिटीने काम सुरूच ठेवले आहे. यामुळे आता आपण सर्वजण मिळून सहकार्य करू, असे सांगत चव्हाण यांनी थोरातांना शुभेच्छा दिल्या. आपल्या कार्यकाळात लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान वंचितचा मोठा फटका आपल्या पक्षाला बसला. त्यामुळेच आम्हाला राज्यात १२ जागांवर त्याचे परिणाम झाले आणि मोठे नुकसान झाले असल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

भाजपचा पराभव करणे शक्य होणार - पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेसने यापूर्वी पराभव पाहिलेला आहे. त्यामुळेच प्रत्येक कार्यकर्ता लढायला तयार आहे. आता अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत थोरात यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, आम्ही सगळे लढायला तयार आहोत. तरीही आम्ही भ्रष्टाचारी सरकारचे चार वर्षात जे वाभाडे काढायला पाहिजे होते ते काढू शकलो नाही. तेथे आपण कमी पडलो. तरीही आता वेळ गेला नाही. आपण एकेक पुरावे समोर आणले तर खरे रूप समोर येईल. त्यामुळेच भाजपचा पराभव करणे शक्य होणार आहे. त्यासाठी यावेळी सावधगिरीने काम केले पाहिजे तरच लोकशाही वाचेल. त्यामुळे इतर पक्षासोबत चर्चा चांगली होईल. उमेदवार जाहीर करा आम्ही कामाला लागू , असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पक्ष सोडून जायचे त्यांना जाऊ द्या. त्यांना बँडबाजा वाजवून पाठवून देऊ. मात्र, जे गेले त्यांना पुन्हा परत घेऊ नका, असे काँग्रेसचे नेते व गुजरातचे प्रभारी राजीव सातव म्हणाले. सेना-भाजपचा खोटे बोलण्याचा अजेंडा आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या पाचही पांडवाला मी शुभेच्छा देतो, असेही सातव म्हणााले. त्यासोबतच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माणिकराव ठाकरे यांनीही एकसंघपणे लढण्यासाठी आश्वासन यावेळी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details