मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सलग तीन दिवस रिया चक्रवर्तीची सीबीआयने चौकशी केली आहे. यानंतर आता सुशांतसिंह राजपूत याची बहीण मितू सिंह हिला सीबीआयकडून समन्स बजावण्यात आला आहे. मुंबईतील डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे सीबीआयचे पथक थांबले या ठिकाणी मितू सिंहची चौकशी करण्यात येणार आहे. तर रविवारी ९ तास चौकशी केल्यानंतर रिया चक्रवर्तीची पुन्हा सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. आज(सोमवारी) ती चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात हजर झाली आहे.
या प्रकरणात मितु सिंहने यापूर्वी बिहार पोलिसांना जबाब दिला होता. पोलिसांना दिलेल्या जबाबात बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या. तिने ९ जून ते १२ जून दरम्यान सुशांतचा घरी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला होता. तसेच, सुशांतच्या आत्महत्या करण्याआधी ८ जूनला रिया चक्रवर्ती व सुशांत सिंगमध्ये मोठे भांडण झाले होते आणि याबद्दलची माहिती स्वतः रियाने मीतू सिंगला फोन करून दिली होती. अशीही माहिती तिने पोलिसांना दिली होती. या पार्श्वभुमीवर आता मितू सिंहची चौकशी करण्यात येणार असून या संदर्भात आणखी काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.