मुंबई - 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांच्या 'रोखठोक सामना'तून सुशांतच्या आत्महत्येचे मार्केटिंग सुरू असल्याचा आरोप करत, आजच्या लेखात सुशांतच्या आत्महत्येच्या तपासावर ताशेरे ओढले. यासोबत त्यांनी अनेक प्रश्नही उपस्थित केले. त्यावर भाजपा आमदार राम कदम यांनी मुंबई पोलिसांवर 'सामना' दबाव निर्माण करत आहे का? असा सवाल विचारला आहे.
सुशांतच्या आत्महत्येचा केला जाणारा उत्सव आणि या प्रकरणाचे सुरु असणारे मार्केटिंग यावर राऊतांनी नाराजीचा सूर आळवत, हा सर्व प्रकार किमान आता तरी थांबवावा, असे म्हणत राज्यात होणाऱ्या इतर आत्महत्यांकडेही त्याच नजरेने पाहावे, असा आग्रह केला. काही प्रकरणांचे दाखले देत राऊतांनी मांडलेले हे मुद्दे पाहता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली असून, हा खून नसल्याचे त्यांनी आपल्या लेखात नमूद केले आणि विविध विषय मांडत त्यांनी आज लेख लिहिला आहे.
राऊत यांच्या लेखावरून आमदार कदम यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी, मुख्यमंत्री यांचे घरचे वृत्तपत्र असलेल्या सामनातून पोलीस प्रशासनावर दबाव टाकत असल्याचे आरोप केला. सामनातून आज जे राऊत यांनी लिहिले आहे, ते मुंबई पोलीस इतके दिवस चौकशी का करत आहेत असा प्रश्न उपस्थित करतं. हे प्रकरण मिटवण्यासाठी सामना पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा कदम यांचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांवर दबाव टाकण्याचे कारण काय? असाही सवाल त्यांनी विचारला आहे.