महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एनसीबी 'ड्रग्ज' तपास: एकाकडून दुसरा, दुसऱ्याकडून तिसरा, तिसऱ्याकडून अनेकांचे कसे होते संबंध? - एनसीबी तपास सुशांतसिंह राजपूत

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) आर्थिक प्रकरणांचा तपास केला जात आहे. मात्र, तपासात 'ड्रग्स सिंडिकेट' आढळून आल्यामुळे याची सूचना अमली पदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी) देण्यात आली. अमली पदार्थ नियंत्रण विभागाने प्रकरणाचा कशाप्रकारे तपास केला, याचा आढावा घेणारा 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष वृत्तान्त...

एनसीबी तपास
एनसीबी तपास

By

Published : Sep 25, 2020, 4:40 PM IST

Updated : Sep 25, 2020, 5:06 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आर्थिक व्यवहारांचा तपास करणार्‍या ईडीला आरोपींच्या व्हाट्सअ‌ॅप माध्यमातून या प्रकणात 'ड्रग्स सिंडिकेट' असल्याची माहिती मिळाली. याबाबत त्यांनी अमली पदार्थ नियंत्रण विभागाला माहिती कळवली. त्यानंतर विभागाकडून याविषयी माहिती घेण्यास सुरुवात झाली. 27 आणि 28 ऑगस्ट या दोन दिवसात एनसीबीने केलेल्या कारवाईत सर्वप्रथम अब्बास लखानी व करण अरोरा या अमली पदार्थ तस्करांना अटक केली. या दोघांच्या चौकशीतून जैद विलात्रा याचेही नाव समोर आले.

जैद विलात्राकडून एनसीबीने तब्बल 9 लाख 55 हजार 750 रुपये भारतीय चलन, 2081 यूएस डॉलर, 180 ब्रिटिश पाउंड जप्त केले. हा सर्व पैसा जैदने अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळवला असल्याचे समोर आले. एनसीबीच्या चौकशीत त्याने मान्य केले की, अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये आपण सहभागी असून त्यातून बराच पैसा मिळवला आहे. जैदच्या चौकशीतून नंतर बासित परिहार या वांद्रे परिसरात राहणाऱ्या तस्कराला ताब्यात घेण्यात आले. त्याने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला आपण गांजा पुरवत असल्याचे कबूल केले.

हेही वाचा -रिया व शोविकला 29 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

यानंतर एनसीबीने शोविक चक्रवर्तीला चौकशीसाठी समन्स बजावले. शोविक चक्रवर्तीकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यानेही कबूल केले की, आपण बासित परिहार आणि कैजाण इब्राहीम यांच्याकडून अमली पदार्थ घेऊन रिया चक्रवर्तीच्या माध्यमातून सुशांतपर्यंत पुरवत होतो. सुशांतचा घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा आणि घरगडी दीपेश सावंत हे अमली पदार्थ जमा करून सुशांतला देत होते. एनसीबीला मिळालेल्या या सर्व माहितीवरून रिया चक्रवर्तीला ताब्यात घेऊन चौकशीनंतर अटक करण्यात आली.

एनसीबीच्या चौकशीत अनुश केशवानी, करमजीत व इतर आरोपींना अटक केल्यानंतर एकूण 585 ग्रॅम चरस, 270 ग्रॅम गांजा, 3.6 ग्रॅम एचसी सारखे अमली पदार्थ जप्त केले. याबरोबरच 1 लाख 85 हजार रुपये सुद्धा जप्त करण्यात आले. यानंतर एनसीबीला मिळालेल्या माहितीवरून करमजीतसिंग फर्नांडिस, संकेत पटेल यांना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला. करमजीतने अमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरलेली अलिशान मर्सिडीज मोटारसुद्धा ताब्यात घेतली.

रिया चक्रवर्तीचा या प्रकरणातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर तिला अटक करून तशा प्रकारची 'स्टेटमेंट'ही नोंदवण्यात आली. याबरोबरच 'डिजिटल फॉरेन्सिक पुरावा' म्हणून व्हाट्सअ‌ॅप संदेशसुद्धा हस्तगत करण्यात आले. रियाच्या चौकशीतून आतापर्यंत जया सहा, श्रृती मोदी, मधू मंतेना, सिमोन खंबाटा यांची चौकशी करण्यात आली आहे. आज 25 सप्टेंबरला रकुलप्रीत सिंग आणि करिष्मा प्रकाश यांची सुद्धा चौकशी करण्यात येत आहे. रकुलची आजची चौकशी पूर्ण झाली असून करिष्मा प्रकाश हिची अजूनही चौकशी सुरू आहे.

हेही वाचा -ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री रकूलप्रीतसिंगला एनसीबीचा समन्स

Last Updated : Sep 25, 2020, 5:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details