मुंबई -बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. सुशांत आत्महत्या करण्याअगोदर ज्या ज्या व्यक्तींच्या संपर्कात होता, अशा सर्व व्यक्तींची चौकशी केली जात आहे. आतापर्यंत पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली आहे. यात सुशांतची बहिण रितू सिंग, सुशांतच्या घरातील एक स्वयंपाकी, नोकर, आर्ट डायरेक्टर व मॅनेजर यांच्यासह सुशांतचा मित्र महेश शेट्टी यांची चौकशी करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे. यासोबत त्यांनी, मागील काही दिवसांपासून माध्यमांद्वारे सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या संदर्भात व्यावसायिक दुश्मनी असल्याच्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. पोलीस विभाग त्यानुसार तपास करणार असल्याचेही म्हटले आहे.
रिया चक्रवर्ती हिच्यासोबत करणार होता लग्न -
सुशांत सिंह राजपूत याची मैत्रिण रिया चक्रवर्ती आणि मित्र महेश शेट्टी यांच्याशी पोलीस संवाद साधत आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुशांत व रिया यांच्यात भांडणे सुरू होती. लवकरच सुशांत व रिया हे दोघे लग्न करणार होते. शनिवारी रियाला सुशांतने फोन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ती फोन उचलत नसल्याने, त्याने त्यांचा कॉमन मित्र महेश शेट्टी याला फोन केला होता. मात्र त्यानेही फोन उचलला नसल्याचे समोर आले आहे.
सुशांत याच्या घरातून ज्या डॉक्टरचे वैद्यकीय कागदपत्र मिळाले आहेत. त्या डॉक्टरांची जबानी पोलिसांनी घेतली आहे. सुशांत याची पूर्व प्रेयसी अंकिता लोखंडे हिचा जबाबही पोलीस घेणार असल्याची माहिती मिळत आहे. सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी २४ तासांत ज्या ज्या व्यक्तींना संपर्क साधला होता, अशा सर्व व्यक्तींची पोलीस चौकशी करणार आहेत.
कुठल्याही आर्थिक संकटात नव्हता सुशांत -
पोलिसांना मिळालेल्या सुशांतच्या बँक डिटेलमध्ये, त्याच्याकडे मुबलक प्रमाणात पैसा होता. शवविच्छेदन अहवालात कुठल्याही अंमली पदार्थांच्या सेवनाचा पुरावा आढळलेला नाही. काही दिवसांपूर्वी सुशांत हा त्याच्या वडिलांच्या संपर्कात होता. ज्यात त्याने नोहेंबर महिन्यात लग्न करण्यासाठी होकार कळविला होता. मात्र त्याच्या खासगी आयुष्याशी निगडित काही गोष्टींचा तपास पोलीस करीत आहेत.