मुंबई :मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत. १० फेब्रुवारी रोजी या दोन्ही गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. आज १३ मार्च रोजी सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन चालवून; पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले. त्याबद्दल सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ८ वर सत्कार करण्यात आला.
पहिली महिला रेल्वे चालक : यावेळी सुरेखा यादव म्हणाल्या की, 'नवीन काळातील, अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे पायलट करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञ आहे. ट्रेन फरफेक्ट वेळी सोलापूर येथुन निघाली आणि वेळेच्या आत सीएसएमटीला पोहचली. यावेळी ट्रेन चालविणे शिकण्याच्या प्रक्रियेत विविध अनुभव आले. सुरेखा यादव या भारतातील पहिली महिला रेल्वे चालक बनल्या. त्या महाराष्ट्राच्या सातारा येथील आहे. 1988 मध्ये त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.