मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नुकतेच सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानाचा हाच काय तो अर्थ असा अंदाज लावला जात आहे. सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यातच काय केंद्रातही मोठा राजकीय भूकंप येईल असे वक्तव्य केले होते. शरद पवार यांच्या राजीनाम्याकडे सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याच्या अनुषंगानेही पाहिले जात आहे.
सुप्रिया सुळे यांनी १८ एप्रिल रोजी राजकारणात दोन मोठे भूकंप होतील असे म्हटले होते. येत्या १५ दिवसात एक भूकंप महाराष्ट्रात होईल. तर दुसरा भूकंप दिल्लीत होईल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. आज शरद पवार यांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना पवारांच्या या घोषणेबाबत माहिती होती असेच दिसते. कारण त्यांनीच याबाबतचे सूतोवाच गेल्या महिन्यात केले होते. मात्र थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद शरद पवार सोडतील याची जराशीही कल्पना कुणाला त्यावेळी आल्याचे कोणत्याच माध्यमातील वृत्तवरुन दिसून येत आहे.
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी सोडणार याचीच चर्चा सर्वत्र सुरू झाली. कारणही तसेच होते. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासंदर्भातील प्रश्नावर त्यांच्यामागे जा आणि त्यांनाच विचारा असे सुप्रिया म्हणाल्या होत्या. त्यातच भाजपच्या नेत्यांचीही अनेक वक्तव्ये अजित पवार त्यांच्याकडे येणार अशी येत होती. याच गदारोळात सुप्रिया सुळे यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय हे कुणालाच कळले नाही. तसेच थेट शरद पवारच राजकीय निवृत्तीची घोषणा करुन मोठा भूकंप घडवतील असे कोणत्याही राजकीय विश्लेषकाने मांडले नाही. त्यामुळे एका अर्थाने सु्प्रिया सुळे यांना आजच्या राजकीय निर्णयाची माहिती होती असेच म्हणण्यास वाव आहे. त्यानुसारच शरद पवार यांच्या आजच्या घोषणेकडे पाहिले जात आहे.