मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात पूर्वीपासूनच तणाव आहे. या दोघांमध्ये सातारा जिल्ह्यातील बाजार समितीच्या 15 एकर जागेवरून वाद होता. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी शिवेंद्रराजे भोसले आणि बाजार समितीचा दावा उचलून धरत उदयनराजे यांचा दावा अमान्य केला आहे.
शिवेंद्रराजे भोसले यांच्या बाजूने निकाल : सातारा जिल्ह्यातील खिंडवाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची 15 एकर जमीन आहे. त्या ठिकाणी जून महिन्यात भूमिपूजनाच्या वेळी दोन गटांमध्ये वाद झाला होता. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आधीचे खटले आणि हा खटला मिळून सर्वोच्च न्यायालयामध्ये तातडीची याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने बाजार समिती आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या बाजूने निकाल देत उदयनराजे यांचा दावा फेटाळून लावला आहे. न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने ही जागा आरक्षित केल्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
दोन्ही नेत्यांचे समर्थक आमने-सामने आले होते : खिंडवाडीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवरून हा वाद होता. त्या ठिकाणी भूमिपूजनावरून देखील वाद झाला होता. तेव्हा दोन्ही नेत्यांचे समर्थक आमने - सामने आले होते. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला होता. याबाबत दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता.
उदयनराजेंना मोठा धक्का :महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्ह्यातल्या खिंडवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा आरक्षित केली आहे. परंतु आपण या जागेचे मूळ मालक असल्याचा दावा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला होता. त्यामुळे ही जागा त्यांना मिळाली पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. सर्वोच्च न्यायालयाने उदयनराजे यांचा दावा अमान्य केल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले गटाचा विजय झाला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल म्हणजे उदयनराजे यांना मोठा धक्का मानला जातो आहे.
हे ही वाचा :
- Udayanraje Bhosale : अजितदादांना शुभेच्छा दिल्या का?, पाहा उदयनराजे काय म्हणाले..