मुंबई:केंद्रीय निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले होते. शिंदे गटाच्या आमदारांच्या पात्रतेचा निर्णय येण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने तातडीने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका करत आयोग बरखास्त करा, अशी जोरदार मागणी केली. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील ठाकरेंच्या मागणीला ट्विट करत पाठिंबा दिला होता. तसेच आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचे स्वामी यांनी म्हटले होते.
उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकाला विरोधात उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचा उच्चार केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरुद्ध कोणताही आदेश देण्याआधी त्याचे स्पष्टीकरण ऐकावे असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी कॅव्हेट अर्ज दाखल केला होता. सत्ता स्थापन झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण आणि नावासाठी लढत आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेतील सुनावणी सुरू असतानाच निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना मूळ शिवसेना पक्ष आणि चिन्ह बहाल केला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका ठाकरे गटाने आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालय याबाबत कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.