महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉक्टर, पोलिसांवर हल्ले कराल तर खबरदार, अन्यथा लष्कराला पाचारण करावे लागेल

राज्यात 21 दिवसांचा लॉकडाऊन, संचारबंदी असली तरी, दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅस अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.

supply-of-essential-milk-vegetable-fruits-medicines-cooking-gas-is-on-regular-says-ajit-pawar
'अमेरिकेप्रमाणे लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी'

By

Published : Mar 26, 2020, 11:46 AM IST

मुंबई- कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत. असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलीस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्यांवर करणार कठोर कारवाई - गुलाबराव पाटील

राज्यात 21 दिवसांचा लॉकडाऊन, संचारबंदी असली तरी, दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅस अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरू आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बारामती, वाई शहरात अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजाने, स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रवासबंदी असताना काही जणांनी दुधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. ही बेपर्वाई चिंताजनक आहे. वसईत पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे कोरोना विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेने कोरोनाचे गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावे, पोलिसांना सहकार्य करावे.


मध्यप्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या एका पत्रकार बांधवाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि उपस्थित पत्रकारांना संसर्ग झाला असण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनी ऑनलाईन संवाद साधून सुरक्षितता राखावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज दुसरा दिवस आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details