मुंबई - मुंबई महानगरपालिकेकडून (Greater Mumbai Municipal Corporation) शिवडी बस डेपो समोर जलवाहिनीचे काम केले जाणार आहे. ( water supply cut off ) यासाठी ७ व ८ जून रोजी शिवडी, परळ, नायगांव, भायखळा माझगाव, फोर्ट, कुलाबा, सँडहर्स्ट रोड आदी विभागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यावेळी मुंबईमधील मोठ्या रुग्णालयांचा पाणी पुरवठाही बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे. तसेच पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
पाणी पुरवठा बंद- बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे एफ/दक्षिण विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता शिवडी बस डेपोसमोर ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोड देण्याचे काम ७ जून रोजी सकाळी १० वाजेपासून ८ जून पर्यंत एकूण २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे. या कारणाने, सदर कालावधीत महानगरपालिकेच्या एफ/दक्षिण विभागातील रुग्णालय प्रभाग, शिवडी (पूर्व व पश्चिम), परळ गांव, काळेवाडी, नायगांव, शिवडी, वडाळा, अभ्युदय नगर, तसेच ए विभागातील फोर्ट कुलाबा, बी विभागातील सँडहर्स्ट रोड,(Sandhurst Road) ई विभागातील भायखळा, माझगांव परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद (Water supply in Mazgaon area) राहणार आहे.