मुंबई:अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओल यांना 'बँक ऑफ बडोदा'कडून अवघ्या काही तासांमध्ये दिलासा मिळाला. 'बँक ऑफ बडोदा'नं सनी देओल यांच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव रद्द केला आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
'बँक ऑफ बडोदा'ने वर्तमानपत्रात नोटीस देऊन सनी देओल यांच्या बंगल्याचा 25 ऑगस्टला ई-लिलावाद्वारे लिलाव करण्याचे जाहीर केलं. बँकेच्या नोटीसप्रमाणं 56 कोटी वसूल करण्यासाठी सनी देओलच्या मालमत्तेची विक्री करण्यात येणार होती. बँकेच्या नोटीसप्रमाणं पंजाबमधील गुरुदासपूरचे खासदार असलेले देओल यांच्यावर 55.99 कोटी रुपये कर्ज आहे. मात्र, नोटीसनंतर दुसऱ्याच दिवशी बँकेनं शुद्धीपत्रक जाहीर केलं. यामधील माहितीनुसार, ई-लिलाव हा तांत्रिक कारणांमुळे मागे घेण्यात आला.
जयराम रमेश यांची बँकेच्या निर्णयावर टीका- 'बँक ऑफ बडोदा'ने देओल यांच्या बंगल्याचा लिलाव रद्द केल्याने काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी टीका केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, 'बँक ऑफ बडोदा'कडून भाजपाचे खासदार सनी देओल यांचे जुहू येथील निवासस्थान ई-लिलावासाठी ठेवण्यात येणार असल्याचं काल देशाला कळलं. खासदार देओल यांनी बँकेचे थकित सुमारे 56 कोटी रुपये दिलेले नाहीत. आज सकाळी, 24 तासांपेक्षा कमी वेळेत 'बँक ऑफ बडोदा'ने 'तांत्रिक कारणास्तव' बंगल्याच्या लिलावाची नोटीस मागे घेतली आहे. या तांत्रिक कारणांना जबाबदार कोण? याचं आश्चर्य वाटत असल्याचं खासदार जयराम यांनी म्हटलं.
सनी देओल यांचा कुठे आहे बंगला?बँकेच्या नोटीसप्रमाणे लिलावात सनी यांचा बंगला आणि आसपासच्या जमिनीचा समावेश आहे. लिलावासाठी बंगल्याची आरक्षित किंमत 51.43 कोटी रुपये ठेवण्यात आली. या बंगल्याचे नाव 'सनी व्हिला' आहे. हा बंगला आलिशान परिसर असलेल्या जुहूच्या गांधीग्राम रोडवर आहे. जमिनीचं क्षेत्रफळ एकूण 599.44 चौरस मीटर आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील जुहू तालुका अंधेरी गावातील सर्वेक्षण क्रमांक 41 भाग क्रमांक 5 (PT) CTS क्रमांक 173 असलेल्या जमिनीवर हा बंगला आहे.
हेही वाचा-
- Gadar 2 Collection : 'गदर २'ने गाठले कमाईचे शिखर; केली 'इतकी' कमाई....
- Sunny Deol : सनी देओलच्या बंगल्याचा होणार लिलाव, 'गदर-2' सुपरहिट होऊनही का आली वेळ?