मुंबई : भाजपा खासदार सनी देओल यांना बँक ऑफ बडोदाने नोटीस बजावली होती. सनी देओल यांनी 'बँक ऑफ बडोदा'डून कर्ज घेतले होते. या कर्जाचे हप्ते देओल यांनी न भरल्याने त्यांच्या बंगल्याचा लिलाव करण्यात येणार आहे. तशी जाहिरात बँकेने दिली आहे.
सनी देओल यांचे हप्ते थकीत : सनी देओल सध्या 'गदर 2' मुळे सर्वत्र चर्चेत आहे. 'गदर 2' चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. गेल्या आठवड्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. मात्र, सनी देओल यांनी करोडोंचे कर्ज बुडवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी सनी देओल काय पाऊल उचलणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
सनी देओल यांच्या बंगल्याचा लिलाव : याबाबत अधिक माहिती अशी की, सनी देओल यांनी 'बँक ऑफ बडोदा'कडून कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्यांनी जुहू येथील त्यांचा 'सनी व्हिला' बंगला तारण ठेवला होता. या कर्जाची एकूण रक्कम 56 कोटी रुपये आहे. सनी देओल यांनी या कर्जाचे हप्ते भरले नसल्याने 'बँक ऑफ बडोदा'ने बंगल्याच्या लिलावासाठी जाहिरात दिली आहे. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, सनी देओलचे निवासस्थान गांधी ग्राम रोड, जुहू येथे आहे. सनी देओल यांचे वडील धर्मेंद्र देओल या कर्जाचे जामीनदार आहेत. बँक सनी देओल यांच्या बंगल्याचा 25 सप्टेंबर रोजी लिलाव करणार आहे. लिलावात या बंगल्याची किंमत 51.43 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, याबाबत सनी देओल यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
'गदर' सिनेमाचा सिक्वेल :'गदर-2' चित्रपट जवळपास 20 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'गदर' सिनेमाचा सिक्वेल आहे. ९० च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या सनी देओल गेल्या दोन दशकांमध्ये मागे पडले होते. मात्र, 'गदर-2'मुळे सनी देओल यांचे करिअर पुन्हा रुळावर आले आहे. हा चित्रपट एकीकडे विक्रम करत असताना दुसरीकडे सनी देओल यांच्या मालमत्तेचा लिलाव होणार आहे.
हेही वाचा -
- Gadar 2 Collection : 'गदर २'ने गाठले कमाईचे शिखर; केली 'इतकी' कमाई....
- Hema Malini : 'गदर २' चित्रपट कसा वाटला, सनी देओलच्या सावत्र आईने 'ही' दिली प्रतिक्रिया
- Kangana Ranaut : रणौतने केली सनी देओलची पाठराखण, वाचा व्हिडिओवर काय दिली प्रतिक्रिया...