मुंबई Sunil Tatkare On Prithviraj Chavan :2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार पाडलं. आपण घेतलेल्या काही निर्णयामुळं राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार पाडलं. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही. अन्यथा हा प्रश्न तेव्हाच सुटला असता, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या कार्यशैलीवर जोरदार आक्षेप नोंदवलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेऊनच पृथ्वीराज चव्हाण आले: केंद्राकडून महाराष्ट्रात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेऊनच पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात आले होते. त्यांनी प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला वैरी मानलं. त्यामुळं राज्यातल्या आघाडी सरकारचा कारभार नीट चालला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यात दिरंगाई केल्यामुळं अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना भेटून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.
मराठा आरक्षण न्यायालयात टिकले नाही : तत्कालीन सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे समिती स्थापन केली होती. शिंदे समितीने आपला अहवाल दिल्यानंतर सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय उच्च न्यायालयात टिकला नाही. यामध्ये सत्ता गेल्यामुळे ते टिकले नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमुळे ते टिकले नाही हे बोलण्याचा त्यांचा काय हेतू आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना आपण ज्येष्ठ आणि अनुभवी नेते मानत होतो. मात्र ते अलीकडे असे विनोद का करतात हे कळत नाही, असा टोलाही तटकरे यांनी लगावला.
काँग्रेसने राष्ट्रवादीला गाफील ठेवत उमेदवार जाहीर केले : निवडणूक पूर्व आघाडी एखाद्या पक्षांमध्ये होत असेल तर दोन्ही पक्षांच्या विचाराने एकत्र निर्णय घेऊन उमेदवार जाहीर केले जातात. मात्र काँग्रेसने त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला गाफील ठेवून राष्ट्रवादी कोणत्या जागा लढवणार याची माहिती घेऊन त्या जागांवरील उमेदवार जाहीर केले. जर निवडणूक पूर्व आघाडी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसला वैरी मानून जर काँग्रेस निर्णय घेत असेल तर, एकत्र काम करण्यात आणि सत्तेला चिकटून राहण्यात अर्थ नाही. हे स्पष्ट झाल्यानंतर सत्तेतून बाहेर पडण्याचा आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला असं तटकरे यांनी स्पष्ट केलं.