मुंबई Sunil Tatkare On Jayant Patil :राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या सुनावणी संदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, आम्ही लोकशाही मार्गाने पक्षातून बाहेर पडलो आहोत. प्रफुल पटेल यांनी दावा केल्याप्रमाणे 43 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. तर नागालँडमधील सात आमदारांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग निश्चितच आमचा विचार करेल आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आमच्या मागणीला यश येईल. केंद्रीय निवडणूक आयोग निश्चितच आम्हाला पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव सुपूर्द करेल, असा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला.
आमचे संख्याबळ स्पष्ट होणार :राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने ज्याप्रमाणे आमदारांच्या अपात्रतेबाबत अर्ज दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा काही आमदारांच्या अपात्रतेबाबत अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी ज्या आमदारांबाबत अपात्रता अर्ज दाखल केले आहे ते पाहता आमच्याकडचे संख्याबळ निश्चितच स्पष्ट होते असंही तटकरे म्हणाले. पक्षाची भूमिका ही नेहमीच भाजपाला पाठिंबा देण्याची राहिली आहे. 2014 मध्येही आम्ही बाहेरून पाठिंबा दिला होता. 2019 मध्येही भाजपासोबत जाण्याचा विचार सुरू होता. इतकेच काय शिंदे बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या झालेल्या बैठकीत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं.