मुंबई - Ram Mandir Inauguration: अयोध्येत राम मंदिराच्या भव्य उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. प्रभू रामाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी क्रीडा, चित्रपटसृष्टी, राजकारण आदी प्रांतातल्या दिग्गजांना निमंत्रित करण्यात आलंय. या यादीत 'रामायण' या लोकप्रिय मालिकेमध्ये रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांचाही समावेश आहे. याशिवाय सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनाही निमंत्रित करण्यात आलंय. भारतीय टेलिव्हिजनच्या प्रांतात इतिहास रचणाऱ्या 'रामायण' मालिकेचं गारुड अनेकांवर आजही कायम आहे. 'रामायण' मालिका सुरु झाली की लोक टी व्ही ला हार घालत. या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत रस्त्यावर अक्षरशः शुकशुकाट असे. अशा अनेक आठवणी नव्या पिढीच्या शिलेदारांना सांगताना आधीच्या पिढीतल्या लोकांच्या नजरेत चमक आलेली असते. या मालिकेची प्रचंड लोकप्रियता लक्षात घेऊनच यातल्या प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलावंतांना श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त निमंत्रित करण्यात आलंय. मात्र'रामायण'मध्ये राम-सीतेसोबत 14 वर्षे वनवास भोगणाऱ्या आणि या काळात प्रत्येक प्रसंगात जीवाभावाची साथ देणाऱ्या छोट्या पडद्यावरच्या लक्ष्मणाचा मात्र विसर निमंत्रण समितीला पडल्याचं दिसतंय. 'रामायण' मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लाहिरी यांना या भव्य कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेलं नाही.
सुनील लाहिरी यांची प्रतिक्रिया
ईटीव्ही भारतशी बोलताना सुनील लाहिरी म्हणाले, "दरवेळी तुम्हाला निमंत्रण मिळालंच पाहिजे असं नाही. पण मला निमंत्रण मिळालं असते तर मी या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्यासाठी नक्कीच गेलो असतो. तरीही काही हरकत नाही, काळजी करण्यासारखं काही नाही.” सुनिल लाहिरींना मनापासून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा आहे. पण त्याबद्दल त्यांची कोणतीही तक्रार नाही, असंच त्यांच्या बोलण्यावरुन जाणवलं.
'रामायणा'च्या निर्मात्यांनाही निमंत्रण नाही