मुंबई Sunil kawale Suicide Case : मराठा आरक्षणासाठी लाखोंचे शांततेत मोर्चे पार पडले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) हे मुंबई दौऱ्यावर आहेत. जरांगे-पाटील यांनी 150 एकर जागेवर सभा घेतली. मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर आज मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यातील सुनिल बाबुराव कावळे (Sunil kawale Suicide) या मराठा तरुणाने मुंबईत आत्महत्या केली. या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी सरकारकडून मंत्री दीपक (Deepak Kesarkar) केसरकर हे सायन रुग्णायलाय गेले होते. या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कावळे कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात येईल, अशी माहिती केसरकर (Kesarkar On Sunil kawale Suicide Case) यांनी दिली.
कावळे कुटुंबियांना सरकारकडून १० लाखांची मदत : मराठा आरक्षणासाठी प्रत्येक मोर्चात सहभागी असणाऱ्या सुनिल कावळे यांनी आत्महत्या केली, ही घटना खूप वेदनादायी आहे. आम्ही कावळे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. मुख्यमंत्र्यांना ही बातमी समजताच, त्यांनी मला माहिती घेण्यास सांगितले. मी कॅबिनेट बैठक सोडून येथे आलो आहे, असे दीपक केसरकर म्हणाले. दरम्यान, मृत कावळे कुटुंबियांना सरकारकडून १० लाखांची मदत देण्यात येईल. तसेच त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी व मुलांचा शैक्षणिक खर्च सरकार करणार असल्याचं केसरकर म्हणाले. कावळे हे शिवसैनिक होते. म्हणून त्यांना शिवसेनेकडूनही आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे केसरकर म्हणाले.
सरकार अतिशय संवेदनशील : मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे, परंतू, कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये. मराठा आरक्षणाबाबत सरकार अतिशय संवेदनशील आहे, पण कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्यावे लागतात. पण मराठा तरुणांनी टोकाची भूमिका घेऊ नये, जेणेकरुन त्यांच्या कुटुंबांना दु:ख होईल. कावळे यांनी अगदी तरुण वयात ही टोकाची भूमिका घेतली आहे. रागाच्या भरात निर्णय घेऊ नये, असे आवाहन केसरकर यांनी मराठा समाजाला केले आहे.
मराठ्यांना आरक्षण मिळेल... : आरक्षणासाठी सरकार आग्रही आहे, ज्या आंदोलकांवर खटले आहेत, ते मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पाऊलं उचलले आहेत. तसेच याबाबत मीसुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. ज्या ओबीसींना सुविधा आहेत, त्या सर्व मराठ्यांना देण्यात आल्या आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळेल, असा विश्वास यावेळी केसरकर यांनी व्यक्त केला.