मुंबईMahadev Betting App Case: महादेव अॅप प्रकरणात गुन्हे शाखेकडे माटुंगा पोलीस ठाण्यातून (Matunga Police Station) गुन्हा वर्ग करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेच्या सायबर शाखेच्या ३ अधिकाऱ्यांची एसआयटी नेमण्यात आली आहे. उत्तर सायबर विभागातील अधिकारी या विशेष तपास पथकात (एसआयटी) असून या तपासात 139 बँक खात्यांची पडताळणी करण्यात आली. यातील 57 बँक खाती ब्लॉक करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता साहिल खान (Actor Sahil Khan) याला लवकरच समन्स पाठवणार असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
32 जणांवर गुन्हा दाखल :'स्टाइल' आणि 'एक्सक्यूज मी' या चित्रपटातील अभिनेता साहिल खानने, महादेव बेटिंग अॅप प्रकरणी माटुंगा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी, बेटिंग अॅप प्रकरणातील एक आरोपी म्हणून साहिल खानचे नाव आले होते. तसेच सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्यासह इतर 32 जणांवर मुंबईच्या माटुंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राज्यात सेलेब्रिटींची चौकशी सुरू : प्रकाश बनकर यांनी दावा केला आहे की, आरोपींनी खिलाडी बेटिंग ॲप वापरून सरकार आणि इतर अनेक लोकांची १५ हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. खिलाडी ॲपच्या सहाय्याने आरोपी जुगार आणि इतर खेळ खेळत होते आणि त्यांनी करोडोंची कमाई केली. आता याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान सौरभ चंद्राकर, रवी उप्पल यांच्यावर यापूर्वी छत्तीसगड पोलिसांनी विविध प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या विरुद्ध ईडीने 'मनी लाँड्रिंग'चा गुन्हाही नोंदवला आहे. याबाबत ईडीकडून देशातील वेगवेगळ्या राज्यात सेलेब्रिटींची चौकशी सुरू आहे.