मुंबई - मुंबईकरांना आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधा पुरवणारी महापालिका पर्यावरण आणि वृक्ष संवर्धनातही आघाडीवर आहे. मुंबई महापालिका झाडांचे बुरशीपासून संरक्षण आणि संवर्धनासाठी गेरू आणि चुन्याच्या लेपनाच्या शास्त्रीय पद्धतीचा वापर करते. मलेशियातील केदाह राज्याचे राजे सुलतान सालेहऊदिन इबनी अलमरहूम सुलतान बदलीशाह यांना या पद्धतीने भुरळ घातली असून, त्यांनी मलेशियातही याचा वापर करण्याचे आदेश तेथील प्रशासनाला दिले आहे.
हेही वाचा -राज्यात शुक्रवारी 3670 नवीन कोरोनाबाधित; 36 रुग्णांचा मृत्यू
उद्यान विभागाच्या कामांचे कौतुक
मलेशियातील केदाह राज्याचे राजे सुलतान सालेहऊदिन इबनी अलमरहूम सुलतान बदलीशाह हे काही दिवसांसाठी मुंबई भेटीला आले होते. त्यावेळी त्यांना मुंबईतील सार्वजनिक परिसरातील वृक्षांच्या खोडांना तांबड्या व पांढऱ्या रंगाचे वैशिष्टपूर्ण लेपन दिल्याचे आढळले. ते मलेशियात परत गेल्यानंतर मलेशियाच्या वाणिज्यदुतांना या मागील कारणांची माहिती घेण्यास सांगितले. त्यानुसार मलेशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत जैनल अजलान मोहम्मद नादजिर यांनी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान येथील महापालिकेच्या उद्यान विभागाला भेट देऊन झाडांना रंग देण्याची कारणे, पद्धती व प्रक्रिया जाणून घेतली. तसेच, मुंबईच्या धर्तीवर मलेशियातील झाडांना देखील गेरू व चुन्याचे लेपन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.