मुंबई : ईडीने बुधवारी उशिरा रात्री शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि महापालिकेचे डॉ. किशोर बिसुरे यांना अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीची स्थापना २०२० मध्ये झाली. ही कंपनी स्थापन झाल्यापासून महिन्याच्या आत कोणताही पूर्वानुभव नसताना कंपनीला हे कंत्राट मिळाले.
वरळी आणि दहिसर कोविड सेंटरवर वैद्यकीय सेवा, डॉक्टर, नर्सेस पुरवण्यासाठी कंपनीला एकूण ३२ कोटी रुपये महापालिकेकडून मिळाले होते. मात्र, कोविड सेंटरवर जितक्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती, त्यापैकी केवळ ५० ते ६० टक्केच डॉक्टर आणि अन्य कर्मचारी नेमण्यात आले होते. उर्वरित कर्मचाऱ्यांची बोगस उपस्थिती दाखवत कंपनीने बनावट बिले सादर करून पालिकेकडून पैसे उकळल्याचा ठपका ईडीने ठेवला. सुजित पाटकर यांच्या कंपनीला जे ३२ कोटी रुपये प्राप्त झाले. त्यापैकी केवळ आठ कोटी कोविड सेंटरवरील कामासाठी खर्च केले. आणि उर्वरीत पैसे हे वेगवगळ्या कंपन्यांच्या नावाने स्वतःसाठी वळवल्याचा फटका पाटकरांवर आहे.