महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. सुजय विखे-पाटील आमच्या संपर्कात नाहीत-अशोक चव्हाण

मी स्वतः डॉ. सूजय विखे-पाटील यांच्या संपर्कात आहे. पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

By

Published : Mar 10, 2019, 11:54 PM IST

मुंबई- राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सूजय विखे-पाटील यांनी घाईघाईत निर्णय घेऊ नये, असा माझा सल्ला आहे. मी स्वतः सूजय यांच्या संपर्कात आहे. पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे ते आमच्या संपर्कात आले नाहीत. आम्हाला अहमदनगरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळावी यासाठी चर्चा सुरू आहे. त्या जागेऐवजी राष्ट्रवादीला दुसरी जागा देता येईल काय? यावरही चर्चा सुरू असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी सायंकाळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, विखे-पाटील यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत जागा वाटपाविषयी सविस्तर चर्चा झाली आहे. जागांचा प्रश्न आता सुटल्यासारखा आहे. यासाठी आमच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक लवकरच होणार असून त्यात जवळपास राज्यातील सर्व जागांचा विषय सोडवला जाणार आहे.

देशातील आणि राज्यात भाजपचा पराभव करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत आले पाहिजे. यासाठी अजूनही आम्ही वाट पाहतोय. त्यांनी आता लवकर मोठेपणा दाखवत निर्णय घ्यावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

ते म्हणाले की, बहुजन वंचित अघाडी आमच्यासोबत यावी, असे आम्हाला वाटते. पण त्यांनी २२ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. आम्ही त्यांना ४ जागा देण्याचे मान्य केले होते. त्या आम्ही देणार आहोत. आता केवळ आंबेडकर यांनी भाजपचा पराभव करण्यासाठी आपला मोठेपणा दाखवावा आणि आघाडीत यावे असेही चव्हाण म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना २ जागा देण्यासाठी आम्ही तयार आहोत. तशी त्यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ४ टप्प्यात मतदान होणार असल्याने चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. यापूर्वी केवळ २ टप्प्यात आपल्याकडे मतदान झाले आहे. मात्र, आता हे ४ टप्प्यात का होत आहे, यामागे कोणती कारणे आहेत? यावर आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचेही ते म्हणाले. राज्यात लोकसभेच्या ४ टप्प्यात मतदान घेण्याचा असा निर्णय का घेण्यात आला, हे मला कळत नसल्याचेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details