मुंबई - महाराष्ट्र काँग्रेसने शनिवारी ‘मोदींच्या १०० चुका’ असे पुस्तक प्रकाशित करत भाजपवर कुरघोडी करण्याची प्रयत्न केला आहे. या पुस्तिकेवर भाजपने प्रत्युत्तर दिले असून या भाजपच्या नव्हे तर काँग्रेसच्या चुका आहेत, असा टोला लगावला आहे. आमच्या १०० चुका काढण्यापेक्षा काँग्रेसने स्वतःच्या १०० उपलब्धी सांगाव्यात, असे आव्हान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसला दिले.
आमच्या १०० चुका काढण्यापेक्षा काँग्रेसने स्वतःच्या उपलब्धी सांगाव्यात - सुधीर मुनगंटीवार
काँग्रेसच्या चुकांमुळे देशात गरिबी निर्माण झाली. काँग्रेसच्या खराब नियोजनामुळेच देश मागे राहिला, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
काँग्रेसने गरिबी निर्माण केली. आमच्या ज्या चुका ते सांगताहेत. त्या चुका काँग्रेसच्या अपयशामुळेच झाल्या आहेत. त्यामुळे ही आमची नव्हे, तर काँग्रेसची गुणपत्रिका आहे', अशी टीकाही मुनगंटीवारांनी या पुस्तिकेवर केली आहे. देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने देशातील दारिद्र्य निर्मूलनाचे आश्वासन दिले होते. ती आश्वासने आज राहूल गांधी देत आहेत, अशी टीकाही भाजपने या पुस्तिकेवर केली आहे.
मागील संपुआ केंद्र सरकारने महाराष्ट्राला अनुदान, करातील हिस्सा ९० हजार ४४१ कोटी रुपये प्राप्त झाले होते. मात्र, भाजपप्रणित रालोआ केंद्र सरकारने ५ वर्षात ६९ हजार ५९८ कोटींची भरीव वाढ होऊन १ लाख ६० हजार ३९ कोटी रुपये देण्यात आले आहे. रस्ते हे कोणत्याही राज्याच्या विकासाची रक्तवाहिनी असते, असे सांगायला काँग्रेसचे नेते कधी विसरले नाहीत. मात्र, त्यांनी पायाभुत व्यवस्था सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न कधी केला नाही. २०१४ पर्यंत महाराष्ट्रात ४ हजार ७६६ किलोमीटरचे महामार्ग होते. मात्र, ४५ महिन्यात साडेबारा हजार किलोमीटरची वाढ होऊन, १७ हजार ७५० किलोमीटरचे महामार्ग राज्यात झाले, असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्या सरकारच्या विकासकामांचा पाठ पढवला. काँग्रेसच्या चुकांमुळे देशात गरिबी निर्माण झाली. काँग्रेसच्या खराब नियोजनामुळेच देश मागे राहिला, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.