मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये पहाटे घेतलेल्या शपथविधीसंदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दावा केला आहे. या दोघांचा पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी होता, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. एका मराठी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार यांनी हा दावा केला आहे.
'उद्धव ठाकरेंनी लोकशाहीची हत्या केली' : आम्ही सरकार स्थापन करताना अजित पवारांना स्वीकारले कारण, निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे ज्या प्रमाणे वागले, ज्या पद्धतीने त्यांनी राजकीय अव्यवस्था जन्माला घातली, त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी अशाप्रकारचा निर्णय घेणे आवश्यक होते, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. मुनगंटीवार म्हणाले, ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल येत होते त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांच्या मनात खुर्चीबद्दल प्रेम जागं झालं. सायंकाळी 4 वाजता त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. मुळात ही प्रेस कॉन्फरन्स आमच्यासोबत संयुक्तपणे व्हायला हवी होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सोबत न घेता एकट्याने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ठाकरे म्हणाले होते की आमच्यासमोरील सर्व पर्याय खुले आहेत. अशाप्रकारे त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी लोकशाहीची हत्या केली होती.
'उद्धव ठाकरेंनी युती धर्म पाळला नाही' :सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी भाजपचा आणि आमच्या मतदारांचा विश्वासघात केला. त्यानंतर आम्ही त्यांना अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना म्हणालो की तुम्ही आमच्यासोबत निवडून आला आहात, परंतु त्यांनी ते ऐकले नाही. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला युतीधर्म शिकवला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनीच तो धर्म पाळला नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.
'उद्धव ठाकरेंनी आमच्या सोबत विश्वासघात केला' : सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत विश्वासघात केला. त्यामुळे त्यांना धडा शिकवणे आवश्यक होते. अजित पवारांनी स्वत: राज्यात स्थिर सरकार आले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांची बेईमानी लोकशाहीला पूरक नाही. त्यांच्या या बेईमानीला आपण योग्य वेळी उत्तर दिले पाहिजे हा पहाटेच्या शपथविधीमागचा भाव होता, असे मुनगंटीवार शेवटी म्हणाले.
हेही वाचा :
- Sanjay Shirsat On Cabinet Expansion : केंद्रात शिवसेनेला दोन मंत्री पदे मिळतील; संजय शिरसाट यांचा दावा
- Nitesh Rane criticize Sanjay Raut : '..म्हणून संजय राऊतांनी महाविकास आघाडी सरकार पाडले', नितेश राणेंचा गंभीर आरोप
- Imtiaz Jalil Allegation : कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही चालते 20 टक्के कमीशनखोरी; खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप