मुंबई- स्थगिती सरकारविरोधात भूमिका घेण्याचा निर्णय, भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. महाविकास आघाडीचे सरकार विकासकामांना स्थगिती देण्यामध्ये पराक्रम करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची 'स्थगिती सरकार' म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद होईल, असा ठाकरे सरकारला टोला भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
मुंबईत महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अन्य नेते उपस्थित होते. तर या बैठकीला पंकजा मुंडे या उपस्थित नव्हत्या. यावर पंकजा मुंडे या प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीने बैठकीला उपस्थित नव्हत्या, असे स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिले आहे.