ETV Bharat / state
Sudhir More Dead Body Found In Mumbai : उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह; सुधीर मोरे यांची रेल्वेपुढं आत्महत्या? - विक्रोळी घाटकोपर विभागाचे विभाग प्रमुख
Sudhir More Dead Body Found In Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे शिवसेनेचे शिलेदार आणि माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सुधीर मोरे यांचा छिन्नविच्छिन्न मृतदेह घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील रुळांवर आढळून आला. सुधीर मोरे यांनी रेल्वेपुढं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
शिवसेनेचे शिलेदार सुधीर मोरे
मुंबईSudhir More Dead Body Found In Mumbai :शिवसेना पक्षप्रमुख ( उबाठा गट ) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) अत्यंत जवळचे मानले जाणारे माजी नगरसेवक सुधीर मोरे (Sudhir More Dead Body Found In Mumbai) यांचा रेल्वे रुळावर संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सुधीर मोरे यांनी रेल्वेपुढं उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सुधीर मोरे यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील रुळांवर अत्यंत छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला आहे. सुधीर मोरे यांच्या पार्थिवावर आज दुपारी घाटकोपर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
रात्री फोन आल्यानंतर गेले होते बाहेर :सुधीर मोरे यांना गुरुवारी रात्री कोणाचा तरी फोन आला होता. त्या फोननंतर वैयक्तिक कामासाठी बाहेर जात असल्याचं सांगून ते घराबाहेर पडले होते. त्यांनी खासगी सुरक्षा रक्षकाला ही माहिती दिली होती. मात्र बाहेर जाताना ते रिक्षानं गेले होते. त्यानंतर आज पहाटे घाटकोपर आणि विद्याविहार या दोन रेल्वे स्थानकांमध्ये असलेल्या पुलाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पहाटे दोन वाजता त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक :सुधीर मोरे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते. विक्रोळी पार्कसाईट परिसरात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक म्हणून त्यांनी मुंबई महानगरपालिकेत विक्रोळी विभागाचं प्रतिनिधित्व सुद्धा केलं होतं. महापालिका प्रभागात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. लोकांमध्ये असलेला त्यांचा दबदबा तसंच शिवसेनेसोबत असलेली निष्ठा या बळावर त्यांना शिवसेनेत अत्यंत प्रतिष्ठेचं स्थान दिलं गेलं होतं. विक्रोळी घाटकोपर विभागाचे विभाग प्रमुख म्हणून सुद्धा त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती.
रत्नागिरी जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी :ईशान्य मुंबईत शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्यावर पक्षानं विशेष जबाबदारी दिली होती. त्याशिवाय रत्नागिरी जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारीही उद्धव ठाकरे यांनी मोरे यांच्या शिरावर दिली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत कायम राहिले. सुधीर मोरे प्रामाणिकपणानं शिवसेनेचं काम करत होते. सुधीर मोरे यांचा मृतदेह रेल्वे रुळावर संशयास्पद आढळून आल्यानं मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.
Last Updated : Sep 1, 2023, 1:16 PM IST