मुंबई:मुंबई महापालिकेचे कांदिवली पश्चिम येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आहे. या रुग्णालयात गेल्या महिन्यात सकाळच्या दरम्यान एका महिलेने मुलीला जन्म दिला. या महिलेची फुल टर्म प्रेग्नन्सी व नॉर्मल डिलिव्हरी झाली होती. या महिलेने जन्म दिलेल्या मुलीचे वजन ३ किलो इतके नोंदवले गेले होते. जन्मानंतर काही वेळात या मुलीचे शरीर निळे पडू लागले. तसेच त्या मुलीला श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल केले.
कृत्रिम श्वासोच्छवास :अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या या मुलीवर ‘बबल सीपॅप’ उपचार पद्धत अवलंबली गेली. त्यानंतरही नवजात बाळाचा श्वासोच्छवास नियंत्रित होत नाही, हे लक्षात येताच तिला इनट्युवेटेड व व्हेन्टिलेटेड करण्यात आले. निष्णात बालरोग व ह्रदयरोग तज्ज्ञ यांचेदेखील मार्गदर्शन यावेळी घेण्यात आले. कृत्रिम श्वासोच्छवास सुरू झाल्यानंतर रुग्णालयातील डी. एन. बी. शिक्षक आणि निओनॅटोलॉजिस्ट डॉ. मुकुंद शिरोळकर यांनी तिची बेडसाईड इको चाचणी केली. चाचणीत ट्रान्सिएन्ट पल्मोनरी हायपरटेन्शनची शक्यता वर्तवल्याने 'स्लाईडेनाफिल' सुरू करण्यात आले.
मुलीला 'हा' आजार :अतिदक्षता विभागात निरिक्षणादरम्यान २ टक्के पेक्षा जास्त प्रमाण अनियमित मानले जाणाऱ्या मेथॅमोग्लोबिनची पातळी ३० टक्के दरम्यान आढळल्यानंतर तातडीने बाळाची एचबी इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी करण्यात आली. हिमोग्लोबिन 'एम'मध्ये अनियमितता आढळली नाही. एन्झाइम्स ऍनालायसिसमध्ये मुलीला 'एनएडीएच सायक्लोटोम बी फाइव्ह रिडक्टेस डेफिशिएन्सी' असल्याचे समोर आले. वैद्यकीयदृष्ट्या ही बाब अत्यंत दुर्मिळ असल्याने बाळाची आई आणि वडील या दोघांचीही चाचणी केली असता दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल आले.
मुलीची प्रकृती सुधारली:डॉ. आंबेडकर रुग्णालयातील बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने या मुलीला इंजेक्शन मिथिनिल ब्ल्यूचे उपचार सुरू केले. ज्यामुळे तिची मेथमोग्लोबिनची पातळी २ टक्के पेक्षा कमी झाली. त्यानंतर बाळाचे एक्सट्युबेशन केले असता, रूम एअरवर ९८ टक्के सॅच्युरेशनसह तिने नियमित श्वासोच्छवास घेण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई देण्यात आले. त्यानंतर या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. आवश्यक त्या तपासण्या आणि चाचण्या केल्यानंतर या मुलीला अतिदक्षता विभागातून डिस्चार्ज देण्यात आला. काही दिवसांनी या मुलीची प्रकृती सुधारल्यावर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. महिन्याभरानंतर या मुलीची प्रकृती उत्तम असून बाळ हसत-खेळत आहे, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
हेही वाचा:Shrikant Shinde On Sanjay Raut : संजय राऊत स्किझोफ्रेनियासारख्या आजाराने ग्रस्त - श्रीकांत शिंदे