सहाराश्री सुब्रतो रॉय यांचं निधन मुंबई Subrata Roy Passes Away : सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांचं मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते 75 वर्षाचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रविवारी कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
दीर्घ आजारानं घेतला अखेरचा श्वास :सुब्रतो रॉय हे गेल्या अनेक दिवसांपासून दीर्घ आजारानं ग्रस्त होते. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना मुंबईतील कोकीलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मंगळवारी रात्री 10.30 वाजता सुब्रतो रॉय यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मेटास्टॅटिक मॅलिग्नेंसी, हायपरटेन्शन आणि मधुमेहामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यातच त्यांना मंगळवारी रात्री कार्डिओरेस्पीरेटरी अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं, असं सहारा समूहाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.
लखनऊमध्ये होणार अंत्यसंस्कार : सहाराश्री सुब्रतो रॉय यांचं पार्थिव बुधवारी लखनऊ इथल्या सहारा शहरात नेण्यात येणार आहे. त्यानंत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज दुपारी 12.30 ते 1 च्या दरम्यान कोकिलाबेन रुग्णालयातून सुब्रतो रॉय यांचे पार्थिव नेण्यात येणार आहे. रुग्णवाहिका मुंबई विमानतळाच्या गेट क्रमांक ८ मधून आत नेण्यात येणार आहे. त्यानंतर सहारा श्री यांचे पार्थिव आज दुपारी 2 वाजता चार्टरने लखनौला नेले जाईल.
कोण होते सुब्रतो रॉय :सुब्रतो रॉय यांचा जन्म 10 जून 1948 मध्ये झाला असून त्यांनी गोरखपूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमधून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी 1976 मध्ये गोरखपूर इथून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यांची सहारा ही कंपनी रियल इस्टेटसह टीव्ही, वृत्तपत्रातही अग्रेसर होती. सुब्रतो रॉय यांनी 1992 ला राष्ट्रीय सहारा नावाचं वृत्तपत्र काढलं, तर सहारा टीव्ही नावाची वृत्तवाहिनीही काढली.
सहारा समूहानं केलं दु:ख व्यक्त :सहाराश्री सुब्रतो रॉय यांचं निधन झाल्यानंतर सहारा समूहानं याबाबातचं निवेदन जारी केलं आहे. या त्यांनी "सहारा इंडिया परिवाराचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांचं निधन झालं आहे. ही आमच्यासाठी अत्यंत दुखाची वेळ आहे. त्यांच्या जाण्यानं सहारा परिवाराला मोठा धक्का बसला आहे. सहाराश्री सुब्रतो रॉय ही आमची मार्गदर्शक शक्ती आणि प्रेरणास्त्रोत होते. त्यामुळे परिवाराची मोठी हानी झाली असून ती वेळोवेळी जाणवेल. त्यांच्या अंतिम संस्काराबाबतची माहिती योग्य वेळी कळवली जाईल", असं सहारा समूहानं काढलेल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे.
सुब्रतो रॉय आणि वाद :सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय आणि वाद हे समिकरण झाल्याचं दिसून येते. सुब्रतो रॉय यांच्यावर मध्यप्रदेशात तब्बल 14 गुन्हे दाखल होते. यात 420 आणि 406 कलमानुसारही अनेक गुन्हे दाखल होते. मध्यप्रदेशातील दतिया इथल्या न्यायालयात त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही काढण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या लखनऊतील घरी कोणीही नसल्यानं पोलिसांना हात हलवत परत यावं लागलं. सेबीकडं सहारा समूहानं 25 हजार कोटी रुपये जमा केल्यानंतरही सेबीनं केवळ 125 कोटी रुपयेच परत केल्याचा त्यांचा दावा होता.
हेही वाचा :
- Subrata Roy in Trouble : सहारा कंपनीचे सुब्रतो रॉय आणखीन अडचणीत; मध्य प्रदेश पोलिसांकडून अजामीनपात्र वॉरंट जारी