मुंबई Subrata Roy Death : सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचं मंगळवारी निधन झालं. मुंबईत वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून 'सहारा' प्रमुख सुब्रत रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजारानं त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांचं पार्थिव लखनऊमधील सहारा शहरात आणलं जाणार आहे. तिथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांनी आपली एक छाप सोडली होती.
देशभरात सहाराश्री म्हणून कमावली ओळख : सुब्रत रॉय यांचा जन्म 10 जून 1948 रोजी बिहारमधील अररिया इथं एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या शासकीय तांत्रिक संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केला. सहारा समूहाची स्थापना करण्यापूर्वी, त्यांनी रिअल इस्टेट व्यवसायात 18 वर्षे काम केलं. त्याशिवाय, त्यांचा बिझनेस डेव्हलपमेंटचा 32 वर्षांचा अनुभव होता. स्वप्ना रॉयशी त्याचं लग्न झालंय. त्यांना 2 मुलं आहेत. त्यातील सुशांतो रॉय हे कंपनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तर दुसरे सीमंतो रॉय हे कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत. सुब्रत रॉय भारतातील आघाडीचे व्यापारी आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना देशभरात 'सहाराश्री' म्हणूनही ओळखलं जात होतं.
11 लाख लोकांना रोजगार : सुब्रत रॉय यांच्या सहारा समुहानं विविध उद्योग-व्यवसायात हात आजमावलाय. सहारा समुहाकडं आयपीएलची पुणे फ्रँचायझी होती तसंच फॉर्म्युला वन रेसिंग टीम फोर्स इंडियामध्ये त्यांचा महत्त्वाचा हिस्सा होता. त्यांच्या समुहाची 90,000 कोटी रुपयांच्या नियोजित गुंतवणुकीसह देशभरात 60 हून अधिक आलिशान टाउनशिप विकसित करण्याची योजना होती. यापैकी अनेक टाउनशिपसाठी भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास संपली होती. या समूहानं आतापर्यंत सुमारे 11 लाख लोकांना रोजगार दिला. तसंच रिअल इस्टेट, वित्तीय सेवा, विमा, मीडिया आणि मनोरंजन, क्रीडा आणि आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रांमध्ये त्यांच्या समुहाचा वाटा होता. बॉलीवूडचे अनेक दिग्गज आणि प्रसिद्ध क्रीडा व्यक्तिमत्व सहाराच्या बहुतेक कार्यक्रमांना नियमित उपस्थित रहात होते. याशिवाय सुब्रत रॉय यांचे समाजवादी पक्षाचे अमर सिंह आणि मुलायमसिंह यादव यांच्याशी चांगले संबंध होते. त्यामुळं सुब्रत रॉय यांना फायदा होत असल्याच्या चर्चा नेहमी होत असे. असं असलं तरी रॉय यांचे जवळपास सर्वच राजकीय नेत्यांसोबत चांगले संबंध होते.
सेबीच्या कारवाईनं सहाराला ग्रहण :सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) सोबत दीर्घ कायदेशीर लढाईनंतर गुंतवणूकदारांविरुद्ध कथित फसवणूक केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहारा प्रमुखांना त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांसह तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्यानंतर 4 मार्च 2014 रोजी त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली होती. त्यानंतर रॉय हे पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आले होते. सुब्रत रॉय यांना व्याजासह गुंतवणूकदारांना 20,000 कोटी रुपये परत करण्यास सांगितलंय. यानंतर रॉय कुटुंबासाठी अनेक संकटांची मालिका सुरू झाली. रॉय यांना तुरुंगात जावं लागल्यानं त्यांच्या व्यवसायाला याचा मोठा फटका बसला.
हेही वाचा :
- Subrata Roy Passes Away : ‘सहाराश्री’ सुब्रतो रॉय यांचं निधन; दीर्घ आजारानं मुंबईत घेतला अखेरचा श्वास
- Subrata Roy in Trouble : सहारा कंपनीचे सुब्रतो रॉय आणखीन अडचणीत; मध्य प्रदेश पोलिसांकडून अजामीनपात्र वॉरंट जारी