मुंबई -कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. गरिबांना परवडणारे धान्य मिळावे, यासाठी रेशनिंग व्यवस्था मजबूत होण्याकडे राज्य सरकारचे विशेष लक्ष आहे. रेशनिंगवर मिळणाऱ्या धान्याबाबत सवलती जाहीर केल्या गेल्या आहेत. परंतु, आधीच पुरवठा कमी त्यात शिधावाटप दुकानावर अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याचे मुलुंडमध्ये उघडकीस आले आहे. स्थानिक आमदार मिहीर कोटेचा यांनी आज त्याची पाहणी केली.
स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचे धान्य; आमदार मिहीर कोटेचांकडून पाहणी - आमदार मिहीर कोटेचा
शिधावाटप केंद्रावर कीटक असलेले निकृष्ट दर्जाचे धान्य मिळते, अशा तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या. आज पाहणी केली. मुलुंडच्या 42 दुकानांपैकी 22 दुकानात हा धान्य पुरवठा झाला आहे, असे आमदार मिहीर कोटेचा म्हणाले.
सदर शिधावाटप केंद्रावर कीटक असलेले निकृष्ट दर्जाचे धान्य मिळते, अशा तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या. आज मी पाहणी केली. मुलुंडच्या 42 दुकानांपैकी 22 दुकानात हा धान्यपुरवठा झाला आहे. अद्याप पूर्ण कोटा आलेला नाही. 9 दुकानात फक्त गहू आला आणि 13 दुकानात फक्त तांदुळ आहे. जर पुरवठाच योग्य झाला नाही तर रेशन अधिकारी आणि दुकानदार करणार काय, असा प्रश्न उपस्थित होतो, असे यावेळी कोटेचा यांनी सांगितले.
शासनाला मी एकच विनंती करेन, की तुम्ही माझ्या विभागातील रेशन दुकानात पूर्ण साठा उपलब्ध करावा. ही राजकारण करण्याची वेळ नाही. काही लोक काम नसतानाही घराच्या बाहेर निघत आहेत, अशांना विनंती आहे, की घरातून बाहेर पडू नका, असे आवाहनही कोटेचा यांनी केले आहे.