मुंबई - वृत्तपत्रे जोमात सुरू अस्तानाच्या काळात वृत्तपत्र लेखकांना मानाचे स्थान होते. तेव्हा वृत्तपत्रात छापून आलेल्या त्यांच्या पत्रांची दखल घेतली जायची. आज तरुण पिढी वृत्तपत्र लेखनच काय वाचनही करत नाही, अशी परिस्थिती आहे. वृत्तपत्र लेखक म्हणजे काय? त्यांची जबाबदारी काय ? याबाबत तरुण पिढीला कळावे, यासाठी ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक कृष्णा काजरोळकर यांच्याशी 'ईटीव्ही भारत' चे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी चर्चा केली.
काजरोळकर हे त्यांच्या निवडक पत्रांचे पुस्तक तरुणांसमोर आणणार आहेत. ३० वर्षात लिहिलेल्या २००० पत्रांपैकी काही पत्रांचा त्यात समावेश असणार आहेत. ऐंशी आणि नवदीच्या दशकात वृत्तपत्रलेखकांना मोठी मागणी होती. वृत्तपत्राच्या पानावर पत्रलेखनाला विशेष जागा आहे. परंतु, कालांतराने पत्रलेखक कमी झाले. त्यावेळी वृत्तपत्र लेखकाला समाजात विशेष मान होता. आता तरुण पिढीने वृत्तपत्र लेखनाकडे पाठ फिरवली आहे. विभागात असलेल्या काही समस्या आणि आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी वृत्तपत्र लेखनाचा वापर केला जात होता. वेळोवेळी सरकारला कानपिचक्या देण्याचे कामही वृत्तपत्रलेखक करत असत. वृत्तपत्रातील पत्रलेखन कसे असावे, याबाबत काजरोळकर यांनी खास मार्गदर्शन केले.