मुंबई - यावर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण आज (गुरुवार) भारतीय मानकानुसार सकाळी ९ वाजून ६ मिनिटांनी सुरू झाले. हे ग्रहण पाहण्याकरता लहाणांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यामध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसत आहे. गोरेगावच्या अ.भि. गोरेगावकर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनीही एकत्र येवून आज सूर्यग्रहण बघण्याचा आनंद घेतला.
सूर्यग्रहण पाहण्यासाठी जगभरातील लोक आतूर असतात. वैज्ञानिकांसाठी तर ही पर्वणीच असते. गुरुवारचे सूर्यग्रहण हे २०१९ या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण गेल्या ५८ वर्षांतील सगळ्यात मोठे सूर्यग्रहण असल्याचे म्हटले जात आहे. ग्रहणाबाबतच्या अंधश्रद्धेला फाटा देत हे सूर्यग्रहण पाहण्याकरता नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. गोरेगावच्या अ.भि.गोरेगावकर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत आज विशिष्ट तयार करण्यात आलेल्या उपकरणातून ग्रहण पाहिले. त्यासाठी शाळेत सुर्योत्सव साजरा करण्यात आला. इतकेच नव्हे तर, यासाठी इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रयोग करून साधने तयार केली होती. या उपकरणातूनच विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहण पाहिले. यावेळी विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण आणि त्यातील प्रकारांची माहिती देण्यात आली. सूर्यग्रहण कसे लागते याच्या माहितीचे पोस्टरही यावेळी लावण्यात आले होते. तसेच ग्रहण बघताना काय काय काळजी घ्यायची असते याबाबत सांगण्यात आले.