मुंबई- लॉकडाऊन झाल्यामुळे गेल्या दीड महिण्यांपासून अधिक काळ आपल्या घरी जाण्यासाठी धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता आपल्या घरी जाता येणार आहे. सामाजिक न्याय विभागाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे,अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना स्वगृही जाता येणार - students live in hostel
मुंबईतील वसतिगृहामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गावी जाता येणार आहे. याप्रमाणेच राज्यातील इतर ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना देखील वैद्यकीय तपासणी, परवानगी घेऊन आपल्या गावी पाठवण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेत.
![सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना स्वगृही जाता येणार Dhananjay Munde](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7121893-464-7121893-1588994593192.jpg)
मुंबई शहर व उपनगरात ७ वसतिगृहे असून त्या ठिकाणी ७१ विद्यार्थी थांबलेले आहेत. याव्यतिरिक्त राज्यातील अन्य काही वसतिगृहांमध्ये ही अनेक विद्यार्थी अडकलेले आहेत. धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना गावी जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने दिलासा मिळला आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मुंबईतील सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले आहे. वसतिगृहांचे गृहपाल यांनी संबंधित पोलीस ठाण्यात प्रवासाच्या परवानगी साठी अर्ज केले असून प्रवासाच्या बसचा परवाना आणि चालकाचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त होताच या विद्यार्थ्यांना विशेष बसने आपापल्या घरी पाठविण्यात येणार आहे.
राज्यात अन्य ठिकाणी वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही याचप्रकारे वैद्यकीय तपासणी करून, रीतसर परवानगी घेऊन आपापल्या घरी जाता येणार असून याबाबत तातडीने आढावा घेऊन कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.